एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा एल्गार

पारंपारीक वेशभूषेत लाखो समाज बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर


नांदेड(प्रतिनिधी)-हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वेशभूषा , वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारा बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथेही विशाल मोर्चा काढू असा इशारा मान्यवरांनी आपल्या मनोगत दिला आहे.


जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटइर नुसार एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गार ही या निमित्ताने पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारकडे बंजारा समाजाला एसटी तून आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे आहेत. हैदराबाद गॅजेटियर आहे यामध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे . 10 जानेवारी 1950 सी पी आणि बेरार सरकारने बंजारा ना एसटीमध्ये समाविष्ट केले आहे . 1871 ते 1931 च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदवला गेला आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर , जयपाल सिंग यांनी संसदेतही ही मागणी मांडलेली होती. याशिवाय वेळोवेळी जे आयोग स्थापन करण्यात आले त्या आयोगाने ही बंजारा समाज एसटी दर्जाच्या मान्यतेस पात्र असल्याचे नोंदवले आहे . यामध्ये लोकूर आयोग 1965 , मंडल आयोग 1980 , न्यायमूर्ती बापट आयोग 2004 , इथात आयोग 2014 , भाटीया आयोग 2014 अशा विविध आयोगाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पात्र ठरवले आहे परंतु जाणीवपूर्वक या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे एसटीमध्ये आदिवासींना सात टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला स्वतंत्र 3 टक्के आरक्षण देण्यात यावे यानुसार आदिवासींना अ मध्ये तर बंजारा समाजाला ब वर्गवारीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी दिली.


नवा मोंढा मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या बंजारा समुदायांशी खा. डॉ. बि.डी चव्हाण , आ. डॉ.तुषार राठोड , रोहिदास जाधव , एडवोकेट रामराव नाईक , प्रकाश राठोड आदी मान्यवरांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांमध्ये क्रांतीचे स्फुलिंग चेतविले. भल्या सकाळी प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन कामाला सुरुवात करणारी बंजारा समाज ही एकमेव जमात आहे त्यामुळे ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीने सत्तेत विराजमान असलेल्या भारतीय जनता पार्टीने प्रभू रामचंद्रांच्या खर्‍या अनुयायांना न्याय देण्यासाठी एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी बि.डी चव्हाण यांनी आपल्या मनोगत आतून लावून धरली. हैदराबाद नुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात मोडतो याची जाणीवही बि.डी चव्हाण यांनी राज्य सरकारला करून दिली. राज्य सरकार जर आमची मागणी मान्य करत नसेल तर येत्या हिवाळी नागपूरच्या अधिवेशनावरही बंजारा समाजाचा विशाल मोर्चा काढला जाईल शिवाय मुंबईत एक कोटी बंजारा बांधव एकत्रित येऊन आपला मोर्चा करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान यावेळी बोलताना आ .डॉक्टर तुषार राठोड यांनीही राज्य सरकारने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. यासाठी बंजारा समाजाने आपली आरक्षणाची मागणी लावून धरत सातत्याने मोर्चे निदर्शने आंदोलने करत राहावीत. निश्चितपणे सरकार आपल्याला आरक्षण देईल असा विश्वास व्यक्त केला. अन्य मान्यवरांनी ही आरक्षणाच्या मागणीसाठी आपली मत व्यक्त केली.
नवा मोंढा मैदानावरून निघालेल्या या विशाल मोर्चामध्ये पारंपारिक वेशभूषा धारण केल्याने हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. किनवट पासून ते आंध्र प्रदेश ,कर्नाटका ,तेलंगणा , विदर्भ या भागातूनही मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते. एक लाखाच्या पुढेही गर्दी या मोर्चा दिसून आली . मोर्चेकर्‍यांनी अत्यंत शिस्तीत परंतु जय सेवालाल च्या घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. या मोर्चाने अख्खे शहर दणाणून सोडले.
या मोर्चात डॉक्टर बी डी चव्हाण , आ. तुषार राठोड, रोहिदास जाधव, एडवोकेट रामराव नाईक , प्रकाश राठोड यांच्यासह पंजाब चव्हाण , आमदार राजेश राठोड जालना ,आमदार रामलू नाईक हैदराबाद , राजू नाईक ,आकाश जाधव, देविदास भाऊ राठोड , शिव नाईक , खासदार प्राध्यापक अजमेरा सिताराम नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड , डॉक्टर टी.सी राठोड , प्राध्यापक संदेश चव्हाण , अमरसिंग तलवार , दीक्षा गुरु श्री प्रेमसिंग महाराज , आमदार बाबू सिंग महाराज धर्मगुरू पोहरादेवी आदी मान्यवरांनी ही आपली उपस्थिती लावली. मोर्चाच्या सभेचे सूत्रसंचालन बाबुराव जाधव यांनी केले तर आभार बंटी राठोड यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!