नांदेड (प्रतिनिधी)– शहरातील हैदराबाद रस्त्यालगत असलेल्या सखोजी नगर भागात चार जणांनी मिळून एका व्यक्तीस मारहाण करून सायबर लुटीचा प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सहा ग्रॅम सोन्याची अंगठी आणि ₹10,000 रोख रक्कम लंपास करण्यात आली.
मारुती सिताराम देशमुख (रा. पिंपळगाव, ता. नांदेड) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, सखोजी नगरजवळ त्यांच्या दुचाकीला अडवून अमन रंगीला, लवली महाराज, पाली महाराज व आणखी एका अनोळखी इसमाने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.मारहाणीनंतर चारही आरोपींनी त्यांच्या हातातील सहा ग्रॅम सोन्याची अंगठी आणि खिशातील ₹10,000 रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 382/2025 नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंधळे अधिक तपास करीत आहेत.
