पीडित तरुणी आणि कुटुंबीयांची मागणी – तपास महिला DYSP स्तराच्या अधिकाऱ्याकडे द्यावा
भोकर,(प्रतिनिधी)- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणाने एका 18 वर्षीय तरुणीला कॉफी प्यायला बोलवून नांदेड येथे आणले, मात्र त्यानंतर तिच्यावर सलग अनेक दिवस अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांची सुरूवातीची भूमिका, तपासातील ढिलाई आणि पीडित कुटुंबीयांची धावपळ लक्षात घेता संपूर्ण यंत्रणेमधील त्रुटी उघड होत आहेत.
घटना कशी घडली?
10 सप्टेंबर रोजी भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक 18 वर्षीय तरुणी तिच्या इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या मित्रासोबत कॉफी प्यायला म्हणून नांदेडला आली. तरुणीच्या सांगण्यानुसार, कॉफी प्याल्यानंतर तिला काहीच जाणवले नाही आणि तिला पुढची शुद्ध थेट मुंबई-पुणे दरम्यान आली. दरम्यान, तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार झाले.
फिर्याद दाखल करण्यासाठी धावपळ, पोलिसांकडून असंवेदनशील वागणूक
पीडित कुटुंबाने सुरुवातीला भोकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “तुमची मुलगी आहे, तुम्हीच शोधा” अशी वागणूक त्यांना मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर एका देव नारायणाच्या माध्यमातून आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या लोकेशनच्या आधारे मुलगी स्वतः कुटुंबीयांनी शोधून काढली आणि नांदेडला आणली.
आरोपींकडून धमकी: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पीडितेला पोलीस अधीक्षक कार्यालयातच आरोपी महिला आणि तिचा मुलगा यांनी धमकी दिली की, “आमच्याकडे तुझे अश्लील व्हिडीओ आहेत, ते सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करू.” या घटनेने पोलीस मुख्यालयात घडलेला हा प्रकार आणखीनच गंभीर बनवतो.
अर्धापूर पोलिसांत गुन्हा दाखल, तपास मात्र पुन्हा भोकरकडे
अखेर पीडितेने अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अर्धापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून, माहिती तंत्रज्ञान कायद्याचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, तपासाची जबाबदारी पुन्हा भोकर पोलिसांकडे वर्ग केल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त झाले आहेत.
कुटुंबीयांची मागणी – महिला DYSP कडे तपास सोपवावा
पीडित कुटुंबीयांनी तपास महिला पोलीस उपअधीक्षकांकडे द्यावा अशी स्पष्ट मागणी केली आहे. विशेषतः कंधारच्या DYSP डॉ. अश्विनी जगताप यांचं नाव त्यांनी सुचवलं आहे. “पोलिस खातं जे करील तेच होईल” या भयानक मानसिकतेत गुन्हा दाबला जाईल, अशी त्यांची स्पष्ट भीती आहे.
गुन्हा नोंदवल्यानंतरही पोलीस मौन, कोणतीही अधिकृत माहिती नाही
या अत्यंत गंभीर प्रकरणात गुन्हा नोंदवून तीन दिवस उलटले तरीही अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात आलेली नाही. हे प्रकरण दाबले जात असल्याची शंका अधिक बळावते आहे.
हे आहेत आरोपी ?
तक्रारीनुसार, या प्रकरणात शुभम राजेश मंठाळकर, अक्षय यशवंतकर, गौरव, वैभव, राहुल मंठाळकर, सविता राजेश मंठाळकर, लक्ष्मण मंगनाळीकर यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्याय मिळावा, हीच मागणी
पीडित मुलीच्या मानसिक स्थितीवर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून, उशिरा का होईना तिने दिलेली तक्रार गंभीरतेने घेतली जावी, आणि योग्य तपास करून तिला न्याय मिळावा, हीच वास्तव न्यूज लाईव्हची मुख्य भूमिका आहे.नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप असतांना असे घडावे हे तर अत्यंत दुर्दैवी आहे.
ती युवती एफ आय आर मध्ये सांगते की मला कोणा तरी विकून देण्याचाही घाट आरोपींनी घातलेला होता.
