कंधार (प्रतिनिधी)-कंधार पोलिसांनी पुन्हा अत्यंत जलद आणि परिणामकारक कारवाई करत १५ सप्टेंबर रोजी पानशेवडी येथे घडलेल्या ३०,००० रुपयांच्या रोख चोरीचा गुन्हा काही तासांत उघडकीस आणला आहे. केवळ संशयाच्या आधारे पोलिसांनी संशयितास अचूकपणे ओळखून, चौकशीतून कबुली मिळवून चोरी गेलेली संपूर्ण रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पानशेवडी येथील शेतकरी पांडुरंग भुजंगराव मोरे हे शेताच्या कामावरून घरी परतल्यानंतर, घरात ठेवलेली ३०,००० रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली होती.घटनेच्या वेळी संशयित संभाजी नारायण गोरे (वय ३५, रा. पानशेवडी यात्रा) हा घटनास्थळाजवळून जाताना मोरे यांनी पाहिला होता. त्यानंतर गुन्हा क्र. ३१५/२०२५ प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे, तसेच पोलीस कर्मचारी धोंडीबा चोपवाड, सुनील साखरे, नामदेव केंद्रे यांनी तत्काळ संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयिताने चोरी केल्याची कबुली दिली आणि चोरीस गेलेली संपूर्ण ३०,००० रुपयांची रक्कम पोलिसांच्या ताब्यात आली.ही तात्काळ व अचूक कारवाई कंधार पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून पोलिसांच्या या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
