
नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणेने नांदेड शहर दणाणले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले श्री. गणेश विसर्जन वृत्त लिहिपर्यंत सुरू आहे. सांगण्यात आले की, गणेश विसर्जनाचा सोहळा पुर्णपणे समाप्त होण्यासाठी मध्यरात्र होईल. प्रशासनाने अनेक ठिकाणी कृत्रिम विसर्जन स्थळ तयार केले आहेत.

आज भाद्रपत चर्तुदशी अर्थात श्री गणेशाला निरोप देण्याचा दिवस. भाद्रपत पौर्णिमा यावर्षी दिवसाच अस्तित्वात आली त्यामुळे काही जणांनी आपल्या गणपतीरायांचे विसर्जन पौर्णिमा सुरू होण्याअगोदरच केले.वाजत-गाजत विसर्जन मिरवणूका सकाळपासूनच सुरू झाल्या. वृत्तलिहिपर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन सुरू आहे. अनेक कौटूंबिक गणपती घेवून संपुर्ण कुटूंब गोदावरी नदीकाठी जाऊन आपल्या श्रीगणेशाला निरोप देत आहे.
यंदा पाऊस जास्त झाल्याने आणि सध्या विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडल्यामुळे वाहते पाणी आहे आणि भरपूर पाणी आहे. काही जणांनी तराफ्यांवर आपले गणेश नदीमध्ये बऱ्याच दुरवर नेले आणि त्यांना विसर्जित केले. नदीकाठी सुध्दा प्रशासनाने कृत्रिम तलाव तयार करून ठेवलेले आहे. बरेच जण त्यातही विसर्जन करत आहेत. अत्यंत धुमधडाक्यात श्री गणेशाला निरोप देण्याचा सोहळा उत्साहात सुरू आहे. शहरातील नावघाट, रामघाट, बंदाघाट, लंगरसाहिब, गोवर्धनघाट या ठिकाणी जाऊन सर्व सामान्य व्यक्ती आपल्या घरगुती गणेशमुर्तीचे आणि सार्वजनिक गणेश मंडळातील मोठ्या मुर्तींचे विसर्जन करत आहेत.
आसना नदीत सुध्दा श्री गणेश विसर्जनाची सोय आहे. त्या ठिकाणी सुध्दा अनेक गणेश मुर्ती विसर्जनासाठी जात आहेत. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा पोलीस दल श्री गणेश विसर्जन सोहळ्यात कोणताही खोडा येणार नाही यासाठी मेहनत घेत आहे. शहरात अनेक ठिकाणी भक्तांनी गणेश मिरवणूकीतील लोकांनासाठी आणि गणेश मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रसाद वाटपाची सोय केलेली आहे. काही जणांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

शहरात अनेक जणांनी आपल्या घरातील श्री गणेशाला आपल्या घरासमोर एका बकीटात पाणी भरून त्यात श्री गणेशाची मुर्ती ठेवून श्री गणेशाला निरोप दिला. खरे तर आजच्या परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी श्री गणेश मुर्तींचे विसर्जन अशाच पध्दतीने व्हायला हवे.

