नांदेड –“विद्यार्थ्यांचे यश म्हणजेच माझे खरे समाधान” असा जीवनदृष्टिकोन बाळगणारे प्रा. डॉ. विजय हट्टेकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात काही दिवसा पूर्वी भावनिक वातावरणात पार पडला. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना घडविले, त्यांच्यात आत्मविश्वास आणि सामाजिक जाण निर्माण केली. याच ऋणाची परतफेड करण्यासाठी सेवानिवृत्तीच्या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले.
डॉ. हट्टेकर यांनी त्यांचे वडील कै. दतात्रय हट्टेकर व भाऊ कै. प्रकाश हट्टेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रकाश प्रतिष्ठानमार्फत बी.ए. व एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी भरघोस रकमेचे पुरस्कार जाहीर केले. तसेच महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी मा. भुजंगराव पाटील किन्हाळकर यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांच्या नावानेही पुरस्कार घोषित करण्यात आले. २० ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयात या सर्व पुरस्काराचे थाटात मान्यवरांच्या हस्ते वितरण झाले या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “आम्ही केवळ शिक्षणच नाही, तर जीवन जगण्याचे धडेही डॉ. हट्टेकर सरांकडून शिकलो,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, प्राध्यापक व कर्मचारी यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.
समाजातील सर्व स्तरांतून डॉ. हट्टेकर यांच्या या दूरदृष्टीपूर्ण आणि हृदयाला भिडणाऱ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा तर मिळेलच, पण शिक्षक-विद्यार्थी नात्याला नव्या उंचीवर नेणारा संदेशही त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
