अतिवृष्टीनंतर प्रशासनाचे अथक परिश्रम

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रासलेल्या जनतेला सीआरपीएफ आणि प्रशासनाने वेगवेगळ्या पध्दतीने मदत करून सुरक्षीत ठिकाणी हलविलेले आहे. अद्यापही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नायगाव तालुक्यातील कुंचली या गावात सीआरपीएफच्या मदतीने 80 नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावात पाणी शिरलेले होते. तेथे बचाव कार्य सुरू करून पाण्यात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. आज सकाळी अटकळी येथे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला बिलोलीच्या स्थानिक प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले. 30 ऑगस्ट रोजी सकाळी अटकळी येथील तलाठी यांनी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना कळविल्याप्रमाणे मौजे टाकळी खुर्द येथे मन्याड नदीच्या पुरात एक व्यक्ती वाहून गेला आहे. त्याने झाडावर आश्रय घेतलेला आहे. त्यानंतर तहसीलदार बालाजी मिठेवाड, त्यांचे सहाय्यक राजेश्वर आलमवाड, शेख युनूस, आशिष जनार्धन आंबोडे आणि बोट ऑपरेट यांनी तेथे जाऊन टाकळी येथे झाडाचा आश्रय घेतलेल्या मारोती हनमंत कोकरे रा.वझरगा यांना बाहेर काढले. या प्रसंगी ग्राम महसुल अधिकारी कल्पना मुंडकर, प्रणिता काळे, शिवाजी धोंडगे, ललित पाटील चव्हाण, मिलिंद सुपेकर, पोलीस अंमलदार काळे, टाकळीगावचे सरपंच व नागरीक तसेच अटकळी गावच्या नागरीकांनी सुध्दा सहकार्य केले.
बेटमोगरा ता.मुखेड येथे मन्याड नदीला आलेल्या पुराच्या वेड्यात दोन दिवसापासून अटकलेले शेख मौला यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अनुप, राजेश जाधव यांनी एसडीआरएफच्या मदतीने रात्री सुरक्षीतपणे बाहेर काढले. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू होती. ज्या गावांमध्ये पाणी शिरले होते. त्या पुरात अडकलेल्या नागरीकांना एसडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. दि.27 व 28 ऑगस्ट रोजी लेंडी नदी, तिरुनदीला आलेल्या पुरामध्ये लेंडी धरणातील बॅक वॉटरचे पाणी मुखेड तालुक्यातील भिगोली गावात घुसले. एका घरात 20 नागरीक अडकले होते. त्यांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात आले आहे. 28 ऑगस्ट रोजी कोट्या येथील तलाव फुटल्याने मुखेड शहरातील फुलेनगर वस्तीमध्ये पाणी शिरले. जवळपास 150 घरांमध्ये पाण्याने हाहाकार केला होता. 250 नागरीकांना नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आदींच्या मदतीने सुरक्षीत बाहेर आणून त्यांना एका जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रय दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!