नांदेड : मराठी साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या निधीतून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड च्या वतीने मुखेड तालुक्यातील रावणगाव आणि हसनाळ येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले . साहित्यिक देवीदास फुलारी , मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, उपाध्यक्ष दिगंबर कदम , कार्यवाह प्रा. महेश मोरे , सह कार्यवाह राम तरटे , कवी शिवाजी जोगदंड आदींची उपस्थिती होती.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने या भागातील रावणगाव , हसनाळ आदी गावांना पुराच्या पाण्याचा प्रचंड फटका बसला होता. घरांची पडझड झाली . नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले . खाण्यापिण्याचाही प्रश्न निर्माण झाला. पुराच्या पाण्यात संसार उपयोगी साहित्य वाहून गेले . याचवेळी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरही पुराच्या पाण्याचे संकट आले होते . या पुरात पाण्याने शालेय साहित्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे पूर सरल्यानंतर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना वही पेनही शिल्लक राहिले नव्हते . अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुन्हा नव्या जोमाने सुरू करता यावे , त्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड ने पुढाकार घेऊन साहित्यिकांमधून निधी संकलित केला . या निधी संकलनासाठी नांदेड जिल्ह्यासह अनेक भागातील साहित्यिकांनी सढळ हाताने मदत केली. जमलेल्या निधीतून हसनाळ आणि रावणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि खाजगी शाळेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वही, पेन , पेन्सिल , खोड रबर , परीक्षा पॅड , पाण्याची बॉटल आदी साहित्य देण्यात आले .
शालेय साहित्य वाटपासाठी हसणाळ येथील पोलीस पाटील बालाजी शिंदे , संदीप शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तर रावणगाव येथे सरपंच राजू पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्र्य यरावार , पत्रकार प्रसाद खेकाळे , बालाजी नायनवाड, अवधूत बंडाळे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. साहित्य चळवळ पुढे नेत असताना वाचणारी पिढी घडावी , ती कोणत्याही संकटात वाचनापासून दूर जाऊ नये , त्यांच्या शिक्षणात खंड येऊ नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मराठवाडा साहित्य परिषदेने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. हा केवळ आमचा खारीचा वाटा होता असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य देवीदास फुलारी यांनी यावेळी व्यक्त केले.
