आज लोकसभा आणि राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र, आजचा दिवस विरोधकांनी गाजवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर असताना विरोधकांच्या घोषणांनी सभागृहात जोरदार गोंधळ उडवला. या पार्श्वभूमीवरही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या स्थगितीनंतर या पावसाळी अधिवेशनात काय काय घडले, याची माहिती दिली.

गेल्या अकरा वर्षांत पंतप्रधानांच्या समोर विरोधकांनी असा गोंधळ प्रथमच घातला आहे. हे लक्षणीय यासाठी ठरते की, अलीकडील काही घटनांमुळे विरोधकांची ताकद वाढलेली दिसत आहे आणि तीच ताकद सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान म्हणून उभी राहत आहे.काल लोकसभेत सादर करण्यात आलेले 130वे दुरुस्ती विधेयकही खूप गाजले. या विधेयकामुळे सरकारला कोणत्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळू शकतात. तसेच, 30 दिवसांच्या आत जामीन न मिळाल्यास त्यांना बडतर्फ करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले जाणार आहेत. सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे गेले असले, तरी ते भविष्यात पास होण्याची शक्यता दिसते. हे विधेयक सरकारसाठी एक महत्त्वाचे शस्त्र ठरू शकते.मात्र, या शस्त्राचा वापर उद्या विरोधकांच्या हातात गेला तर काय होईल? आज जे निर्णय लोकशाहीच्या नावाखाली घेतले जात आहेत, ते उद्या हुकूमशाहीकडे वाटचाल करणारे ठरतील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे अनेक वेळा विरोधकांना बोलू देत नाहीत, त्यांच्या कॅमेऱ्यांचा फोकस दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न करतात. मात्र आज विरोधकांनी सभागृहावर पूर्ण ताबा मिळवला आणि कामकाज त्यांच्या हातात घेतले, असा देखावा स्पष्टपणे दिसून आला.आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आले आणि त्यानंतर घोषणाबाजी अधिकच तीव्र झाली. यावेळी पंतप्रधानांच्या समर्थक खासदारांकडून ‘मोदी-मोदी’ अशा पारंपरिक घोषणांचा आवाज ऐकायला आला नाही. उलट, “व्होट चोर”, “गद्दी छोड “,अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे ‘गोदी मीडिया’ साठी आज कोणतीही हेडलाईन तयार होऊ शकली नाही.

ओम बिर्ला यांनी विरोधकांना अनेकदा सांगितले की “देश तुम्हाला पाहत आहे”. हे खरेच होते, देश पाहत होता, ऐकत होता.काल सादर झालेले 130वे दुरुस्ती विधेयक आज गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडले. मागील सात वर्षांत त्यांचे रौद्र रूप अनेकदा पाहायला मिळाले. मात्र काल लोकसभेत विरोधकांनी त्यांच्या हातातले विधेयक फाडून त्यांच्या दिशेने फेकले. आज राज्यसभेत हे विधेयक सादर करताना सभापती हरिवंश त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण घोषणाबाजी सुरुच होती “तडीपार गो बॅक!”

मागील अकरा वर्षांत इतकी तीव्र घोषणाबाजी कधीही झाली नव्हती. ही घोषणाबाजी सभागृहाच्या अभिलेखात जरी राहिली नाही, तरी देशाच्या आठवणीत नक्की राहील.सत्राच्या चहापान कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार होते, अशी अपेक्षा होती. मात्र, विरोधकांपैकी एकही खासदार या कार्यक्रमाला गेला नाही. ही एकजूट गेल्या अकरा वर्षांत पहिल्यांदाच इतकी ठामपणे दिसली आहे. सरकारला आता केवळ एकाच व्यक्तीची भीती वाटते, ती म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी.कधीकाळी ‘पप्पू’ म्हणून हिणवल्या गेलेल्या राहुल गांधी याच सरकारसमोर आता अत्यंत ठाम आणि ताकदीने उभे आहेत. त्यांच्यावरील ही भीती सरकारच्या अनेक कृतींमध्ये स्पष्टपणे दिसते.
आज राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी उपसभापती हरिवंश यांची जी ‘आरती’ केली, ती हरिवंश यांना दीर्घकाळ लक्षात राहील. शब्द अपमानास्पद नव्हते, पण तीव्र हो ते.पत्रकारितेतील एक दुर्दैव म्हणजे, हरिवंश हे पूर्वी पत्रकार होते, आणि आज ते सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. जगदीप धनखड यांचे रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांनी झपाट्याने प्रयत्न सुरू केले आहेत.आज लोकसभेत “व्होट चोर गद्दी छोड़”, आणि राज्यसभेत “तडीपार गो बॅक” अशा घोषणा दिल्या गेल्या. या दोन घोषणांनी आजचा शेवटचा दिवस गाजवला. अधिवेशन जरी संपले असले, तरी या शब्दांचा परिणाम भविष्यात नक्कीच जाणवेल.
