नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची अनोखी पर्वणी मिळाली. शास्त्रीय संगीतातील उदयोन्मूख असलेल्या या गायकाने नांदेडकरांना शास्त्रीय संगीताची प्रदीर्घ आलापी, ताना व अतुलनीय सुरावटीने नांदेडकर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.

डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नव्याने नुतनीकरण झाल्यानंतर या सभागृहात एखादा दर्जेदार कार्यक्रम व्हावा अशी नांदेडकरांची इच्छा होती. उद्घाटन झाल्यानंतर या सभागृहात चांगला कार्यक्रम होण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. त्यातून पुण्याच्या एका संस्थेमार्फत व नांदेडच्या आऊटलुक स्टुडिओच्या माध्यमातून नांदेडातील काही प्रायोजक एकत्र आले आणि १५ ऑगस्ट संध्याकाळ नांदेडकरांना या सभागृहात मंत्रमुग्ध करुन गेली. राहुल देशपांडे यांनी कुठलेही निवेदन किंवा निवेदक न घेता सलगपणे तेरा गाणी सादर करुन या कार्यक्रमात खर्याअर्थाने जान आणली. त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी दिप्ती माटे यांनीही दोन गिते गायिली. सुरुवातीला तुज मागतो मी आता या श्री गणेशाच्या गिताने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर उत्तरोत्तर हि मैफल रंगत गेली. टाळ बोले चिपळीला, सावरे ऐ जयो, वेदान नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरा, माझे माहेर पंढरी, अबीर गुलाल उधळीत रंग या भक्ती भाव संगीताच्या माध्यमातून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट आणि श्रोत्यांचा वन्समोअर यामुळे या कार्यक्रमात रंगत आली. दिल की तपीश आज है अफताब या कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गाण्याने तर बहारच केली. गाण्यातील हरकती, ताना व दूरवर नेलेला आलाप हे राहुल देशपांडे यांच्या गाण्यातील वैशिष्ट्ये होते. ज्या ताकदीने त्यांनी हि गिते सादर केली त्याला रसिक, प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सांवरे ऐ जय्यो नदीया किनारे मोरा गांव या गाण्यानेही बहार केली. सध्या गाजत असलेले त्यांचे गाणे म्हणजे रंगी रंगुनीया रंगी रंगुनीया रंगी रंगला श्रीरंग पांडूरंग रंगी रंगुनीया या गिताने तर बहारच आणली. रंग दे रंग दे रंग दे ना या गितानेही रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शेवटी मॅशपच्या माध्यमातून भक्तीगिते सादर केली. त्यांनी कानडा राजा पंढरीचा हि भैरवी सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाची संगीतसाथ तबल्यावर निखिल पाठक, पकवाज व अॅक्टोपॅडवर ओंकार इंगवळे, हार्मोनिवर मिलिंद कुलकर्णी, की बोर्डवर विशाल धुमाळ यांनी साथ केली. तर ध्वनी व्यवस्थेचे नियोजन प्रशांत कांबळे यांनी व्यवस्थित सांभाळले. स्थानिक नियोजनात व्यवस्थापक म्हणून सचिन मोहिते यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा नांदेडकरांच्या वतीने सत्कार केला. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अनेक मान्यवर तसेच संगीत रसिक उपस्थित होते.

