भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न

*नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे*

नांदेड – केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची वाटचाल प्रगतीशिल असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विभाग प्रमुख, नागरिक, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

देशात हर घर तिरंगा हा उपक्रम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमात नांदेडकरांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घेतला. याबद्दल पालकमंत्री यांनी सर्वांचे आभार मानले. जिल्ह्यात पावसाची स्थिती चांगली असून पीक परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता शासनाच्यावतीने घेतली जात असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

 

जिल्ह्यात लेंडी प्रकल्पामुळे 15 हजार हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या कामाच्या घळभरणीचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या 19 गावांतील शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगारासोबत उद्योग उभारणीला बळ दिले जात असून युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.

 

जिल्ह्यात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून विष्णुपूरी येथील ब्रीजचे काम व नवीन न्यायालयाच्या इमारतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 112 प्रस्तावित सौर ऊर्जा उपकेंद्रापैकी 70 ठिकाणी 1 हजार 150 एकर जमीन महावितरणला प्रदान करण्यात आली आहे. यासाठी जमिनीची उपलब्धता खूप कमी कालावधी जिल्हा प्रशासनाने केली. त्यामुळे पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन व कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

ध्वजारोहणानंतर सलामी देण्यात आली. सलामी पथक कमांडर पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.

 

*राष्ट्रपती पदक व विशेष सेवा बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार*

पोलीस उपनिरीक्षक धोंडीबा माधवराव भुत्ते यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबाबत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तर पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते, शिवराज लोखंडे, महाजन राजेश्वर मैसनवार, शंकर धनाजीराव मोरे, अभिजीत गणेशराव तुतुरवाड, खंडु चांदु दर्शने यांना विशेष सेवेबाबत सत्कार करण्यात आला.

 

*अवयवदान केलेल्या कुटूंबियाचा सत्कार*

श्रीमती चंद्रकला प्रल्हाद रावळकर, श्रीमती भाग्यश्री संतोष मोरे, श्रीमती सोनाली भुजंग मस्के, श्रीमती लक्ष्मीबाई दादाराव पवळे, श्रीमती शोभा सूर्यकांत साधू, श्रीमती प्रिया अभिजीत ढोके, श्रीमती अरुणा विठ्ठल भुरके यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी पूर्व प्राथमिक राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, सीबीएससी गुणवंत विद्यार्थ्यांस पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!