नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यात व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून जनावरांची तपासणी करणे, तसेच काही प्रकरणांमध्ये मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेने विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोज कुमार शर्मा यांच्या स्वाक्षरीने एक विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
व्यापारी शेख जाकीर कुरेशी यांच्या अर्जानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यभरातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना यासंदर्भातील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात केवळ पोलीस किंवा इतर संबंधित अधिकाऱ्यांनीच कायदेशीर कारवाई करावी. खाजगी व्यक्तींनी गाड्या अडवून तपासणी करणे, अथवा मारहाण करणे हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र, अवैध पशु वाहतुकीबाबत कुणाही नागरिकाने तक्रार केली, तर ती तात्काळ नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
गुरांची वाहतूक करताना सर्व कायदेशीर अटी व नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री करावी, अशा सूचनाही या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. तसेच नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांची अडकलेली जनावरे परत देताना कायदेशीर बाबींची पडताळणी करून नियमानुसार कारवाई करावी, असेही या पत्रात म्हटले आहे.
याशिवाय, महाराष्ट्र ॲनिमल ॲक्ट 1976 (सुधारित 2015) अंतर्गत जनावरांशी संबंधित प्रकरणांमध्ये कलम 8 (3) नुसारच कार्यवाही करावी, अशीही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
हे परिपत्रक राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना पाठवण्यात आले असून, याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
