परभणी,(प्रतिनिधी)-परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 00.01 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी विजयाबाई व्यंकटेश सूर्यवंशी (आई) यांच्या तक्रारीनुसार, या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे.
हा गंभीर प्रकार 15 डिसेंबर 2024 रोजी घडला होता. 14 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुसऱ्याच दिवशी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी समाजात तीव्र संताप निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस विभागाने हे आदेश सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींची नावे माहीत नसली तरी एफआयआर दाखल केला जाऊ शकतो.याच निर्णयाच्या आधारावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) नुसार गुन्हा क्रमांक 343/2025 दाखल झाला आहे.
फिर्यादी विजयाबाई यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, “माझा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे, हे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले, जिथे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आम्हाला सांगितले की तुमचा मुलगा मारहाणीत नव्हे, तर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. तसेच, आम्हाला मदत करण्याचे आश्वासन देत त्यांनी सांगितले की,तुमच्या दुसऱ्या मुलाला पोलीस प्रशिक्षण देऊ,आणि प्रेत गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.”मात्र, घाटी रुग्णालयाच्या अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ‘शॉक ड्यू टू ट्रॉमा’ म्हणजेच जबर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, सोमनाथ सूर्यवंशी आणि अन्य 12 आरोपींना एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक यांच्या पथकाने 14 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले. हे सीसीटीव्ही फुटेजमध्येही आढळून आली आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक बनसोड यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत कोणतीही ” ईल ट्रीटमेंट” म्हणजे मारहाण झाली नाही.या विरोधाभासावरून हे स्पष्ट होते की, मारहाण पोलीस ठाण्याबाहेर किंवा ठाण्यात आणण्याआधीच झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जे अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी ताब्यात घेतले, त्यांनीच मारहाण केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला असून, पारदर्शक आणि योग्य तपास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणीत न आणता, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाचा तपास परभणीबाहेरील कोणत्यातरी आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी करावी, अशी विनंती काही समाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
संबंधित बातमी ..
परभणी लाठीचार्जचे आदेश घोरबांडचेच ;गुन्ह्याचा तपास निर्भिड आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा
