नांदेड –आज सकाळी ८:३० ते ९:०० या वेळेत खुदबाईनगर चौकात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. या व्यक्तीवर खंजीराने पोटात तीन-चार वार करण्यात आले असून, घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव शेख अजीम शेख समद (वय ५५) असून ते मूळचे परभणीचे रहिवासी आहेत. सध्या ते खुदबाईनगर, नांदेड येथे वास्तव्यास होते.आज सकाळी शेख अजीम यांनी आपला ॲटो खुदबाईनगर चौकातील इतका मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावला होता. त्या ठिकाणी एक पानटपरी होती, जी मोहम्मद इमरान मोहम्मद गौस (वय ४५) याची मालकीची होती.दुकानासमोर ऑटो लावल्याच्या कारणावरून शेख अजीम आणि मोहम्मद इमरान यांच्यात वाद झाला. वादाच्या पार्श्वभूमीवर, मोहम्मद इमरानने आपल्या सहकाऱ्यांसोबत चाकूने शेख अजीमवर हल्ला केला. या हल्ल्यात शेख अजीम यांच्या पोटात तीन-चार घाव झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आवश्यक सूचना दिल्या असून, मोहम्मद इमरान मोहम्मद गौस याला ताब्यात घेण्यात आले आहे.
