नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगात असणाऱ्या प्रभाकर हंबर्डे या गुन्हेगाराला मंगळवारी पोलीसांनी गोळीबार करून ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर या ंनी दिली. गोळीबार घडल्यानंतर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी दवाखान्यात भेट सुध्दा दिली. पोलीसांवर जिवघेणा हल्ला केला अशा स्वरुपाचा गुन्हा प्रभाकर हंबर्डेविरुध्द दाखल करण्यात आला आहे.

विष्णुपूरी येथील रहिवासी असलेला प्रभाकर हंबर्डे याच्याविरुध्द अत्यंत गंभीर स्वरुपाचे 9 गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपुर्वीच मकोकासारख्या खटल्यातून जामीन मिळवून बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर सुध्दा त्याने गुन्हे केले. या संदर्भाने मंगळवारी रात्री पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांचे कर्मचारी हे त्याला पकडण्यासाठी गेले असता पोलीसांना पाहताच तो पांगरी रस्त्याकडे पळाला. त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून तो पोलीसांवर गोळी झाडेल अशी परिस्थिती तयार होताच. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी स्वत:च्या आणि आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ आपल्या बंदुकीतून प्रभाकर हंबर्डेवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या पायातून आरपार निघून गेली आहे. जखमी अवस्थेतील प्रभाकर हंबर्डेला पोलीसांनी शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचारार्थ दाखल केले आहे.

