नांदेड(प्रतिनिधी)-10 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुळ गोळीबार करणारा आणि त्याचा एक साथीदार पंजाब पोलीसांनी पकडला होता. त्या दोघांना नांदेडला आणल्यानंतर त्यांच्यासोबत नांदेडचा एक अशा तिन जणांना न्यायालयाने 10 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
10 फेब्रु्रवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार हा आज जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र रविंद्रसिंघ दयासिंघ राठोड गोळीबारात मरण पावला होता. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्व प्रथम मनप्रितसिंघ उर्फ मन्नु गुरबक्षसिंघ ढिल्लो उर्फ नहेंग (31) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पी बाबुसिंघ कारपेंटर (25) या दोघांना अटक झाली. या प्रकरणात पुढे पंजाब येथील अरशदीपसिंघ उर्फ अर्शी भजनसिंघ गिल्ल (22) रा.तरणतारण जि.पंजाब याला अटक झाली. त्यानंतर दलजितसिंघ उर्फ जित्ता करमजितसिंघ संधू (41) आणि हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (32) यांना अटक झाली. हा गुन्हा सुरूवातीला वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. काही दिवस वजिराबाद पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास केला आणि नंतर हा गुन्हा दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग झाला.
यातील पहिले दोन आरोपी वजिराबाद पोलीसांनी अटक केले होते. नंतरचे तीन दहशतवाद विरोधी पथकाने अटक केले. दरम्यान 24 फेबु्रवारी 2025 रोजी पंजाब पोलीसांनी नांदेडमध्ये गोळीबार करणारा मुख्य आरोपी जगदीपसिंघ उर्फ जग्गा सुखवंतसिंघ (32) आणि शुभदिपसिंघ उर्फ शुभ गुरविंदरजितसिंघ अवलख (31) यांना पकडले. नांदेड येथून हस्तांतरण वॉरंटच्या आधारे त्या दोघांना नांदेडला आणण्यात आले आणि त्यानंतर नांदेड येथील पलविंदरसिंघ अवतारसिंघ बाजवा (30) अशा तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिघांना 10 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
10 फेब्रुवारीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांना पोलीस कोठडी
