क्राईम रिपोर्टर व्हाटसऍप ग्रुपमध्ये झालेल्या चर्चा हास्यास्पद

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या मिडीयामध्ये होणाऱ्या विदुषकीला काय म्हणावे ! आप-आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आजच्या तंत्र युगात फेसबुक पेज, ट्विटर पेज, एक्सपेज, व्हाटसऍप, इंस्टाग्राम अशा अनेक सामाजिक संकेतस्थळांवर आपल्या नावाने आपल्या कामगिरीला प्रसारीत करण्याची एक प्रथा तयार झाली आहे. परंतू सामाजिक संकेतस्थळांवर आपण बोलत असतांना त्यातील तारतम्य लक्षात नसावे हे पत्रकारांसाठी दुर्देवी प्रकार आहे. जगाला आम्हीच सर्वात भारी आहोत असे दाखवतांना आपल्यातील कमतरता शोधण्याकडे सुध्दा कल असावा. आम्ही इतरांसाठी सांगत आहोत तर आमच्याबद्दल सुध्दा बोलण्याचा इतरांना अधिकार आहे याची जाणिव आम्ही ठेवूनच हा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो.
आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये आपल्या विचारांना प्रसारीत करण्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे तयार झाली आहेत. त्यामध्ये फेसबुक पेज, ट्विटर पेज, एक्सपेज, व्हाटसऍप, इंस्टाग्राम अशा संकेतस्थळांचा समावेश आहे. नांदेडमध्ये सुध्दा एका महान पत्रकाराने क्राईम रिपोर्ट नावाचा एक व्हाटसऍप गु्रप तयार केला आहे. ज्यामध्ये अनेक पत्रकार, शासकीय अधिकारी, काही राजकीय पक्षांचे नेते सदस्य आहेत. पत्रकारीता करतांना सर्वात विद्वान आम्हीच असे दाखविण्याचा एक प्रघात तयार झाला आहे. त्यासाठी सुध्दा तंत्रज्ञान महत्वपुर्ण आहे. बसल्या जागी सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत मेटा आणि गुगलवर सुरू असलेल्या विषयाचा शोध घेवून त्यातील एखादा खोचक प्रश्न विचारून मी किती ज्ञानी आहे हे दाखविण्याचा प्रघात सुरू झाला आहे. हा प्रकार येथेच होतो असे नाही. टीव्हीवर होणारे डिबेट पाहा त्यात सुध्दा एखाद्या व्यक्तीवर झालेल्या आरोपाचे उत्तर देण्यासाठी तो व्यक्ती लगेच मोबाईल हातात घेवून त्यात काही तरी शोधतो आणि आपली बारी येईल याची वाट पाहतो. असो तंत्रज्ञानाचा उपयोग घ्यावाच यात काही वाईट नाही. नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुध्दा आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा वापर पत्रकारांनी करावा असे एका कार्यक्रमात सांगितले होते.
नांदेडमध्ये क्राईम रिपोर्टर गु्रपमध्ये काल झालेली चर्चा हास्यास्पद आहे. कोणताही व्हाटसऍप ग्रुप असेल तर त्यावर आपल्याकडील माहिती प्रसारीत करून ती इतरांना माहित व्हावी हा त्याचा मुळ उद्देश आहे. पत्रकारांसाठी तर आर्टीकल 19 संविधानाने दिलेले आहे. त्याला तर कोणीच आव्हान देवू शकत नाही. मग ही घटना टाका किंवा ही घटना टाकू नका असे म्हणता येणार नाही आणि असा विचार असेल तर प्रत्येक गु्रपचा ऍडमिन असतो. त्याच्याकडे हे अधिकार असतात की, कोणत्याही सदस्याने टाकलेली त्या गु्रपमधील पोस्ट ठेवायची किंवा काढून टाकायची. हे अधिकार असतांना ही पोस्ट तशीच ठेवून त्यावर चर्चा घडेल असे केल्यामुळे हा प्रकार हास्यास्पद वाटतो.
काल घडलेल्या प्रकारामध्ये एका सदस्याने एका मृत्यूची माहिती टाकली होती. त्यावर गु्रप ऍडमिनने यासाठी आपल्या भावना व्यक्तीगत क्रमांकावर द्याव्यात गु्रपवर नव्हे अशी सुचना केली. यावर एका अत्यंत विद्वानाने संवेदना ज्याचा मृत्यू झाला त्याला फोन करून सांगाव्यात काय अशी विचारणा केली. यावर गु्रप ऍडमीनने हास्याचा इमोजी टाकला. त्यावर एकाने अरे रे काय बोलताय असे लिहिले. त्यावर गु्रप ऍडमीन लिहितात तुम्हाला काय त्रास होतोय काय? पत्रकारांनी अशा चर्चा कराव्यात आणि त्यावर अशा प्रतिक्रिया याव्यात याचे दु:ख वाटत आहे. आपल्या बातम्यांच्या माध्यमातून इतरांना धडे शिकवण्याचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला असतांना अशा फालतू चर्चा करून काय मिळवले. ज्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती त्या पोस्टमध्ये होती. त्यांच्या नातलगांना कोणी या चर्चा सांगितल्या असतील तर त्यांचा पत्रकारांबद्दल काय विचार झाला असेल. हा विचार आम्ही करत असतांना आमच्या शरिरावर काटा येत आहे. तरी हिम्मत करून असे लिहितो की, जे शासकीय अधिकारी या गु्रपचे सदस्य असतील त्यांनी तुमच्या बद्दल किती उत्कृष्ट विचार केला असेल हे नक्कीच विचार करा. आम्ही कोणाबद्दल लिहितो तेंव्हा हा अधिकार आमच्या विरुध्द त्यांना असल्याची जाणिव आम्हाला आहेच. तरीपण जागृरुकता व्हावी या उद्देशासह या लिखाणात दुसरा उद्देश नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!