डोईवर विद्वत्तेची तुळस घेऊन ‘काळा सावळा विठ्ठलाचा’ महिमा सांगत हुकूमशाही कडे झुकलेल्यां सत्ताधाऱ्यांना समतेचा संदेश सांगत चालणारी ‘तारा भवाळकर’ नावाची मराठी महिला काल ऐकायला मिळाली. आणि त्याच परंपरेच्या मंदिराचा कळस बनलेल्या तुकारामाच्या नावावर पोट भरणारे लोभी व दिशाहीन कीर्तनकार सगळीकडे पहायला व ऐकायला मिळतात. या अशा आगळ्यावेगळ्या महिलेबद्दल बोलूया नंतर पण ‘या अशा’ कीर्तनकारांनी मराठीच व महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलेल आहे. त्यांच्या मागील खरी शक्ती कोणती आणि ती कुठे कुठे कार्यरत आहे?
कीर्तनात जास्त करून ज्यांचे अभंग गायिले जातात तो तुकाराम आम्हाला समजला नाही आणि ज्यांना समजला त्यांना पेलला नाही! आमचा व तुकारामाचा खरा शत्रू आम्हाला का समजला नाही? काहींना समजला तरी त्याला ललकारण्याचे धाडस का नाही?
मी तो ओळखला!
तो आहे माझ्याच धर्मातील स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणारा ब्रह्म वृंद!
ब्राह्मण म्हनवून घेणारांचा बामनी कावा जाहीर पणे मी माझ्या भाषणात आणि पुस्तकात दिलेला आहे. त्यावेळी काहींनी मत व्यक्त केले की याला ब्राह्मण पोरीने प्रेमात नकार दिला असावा. काहींनी स्पष्ट लिहिले की याला अरविंद इनामदार नावाच्या ब्राह्मण अधिकाऱ्याने त्रास दिला होता. काहींनी अर्थ काढला की याला आपण शूद्र असल्याचा न्यूनगंड आहे म्हणून तो ब्राह्मणांचा द्वेष करतो. पण तसं काहीच नाही. हा निष्कर्ष मी केलेल्या विविध संशोधन पद्धतीतून इथल्या समाज व्यवस्थेचा केलेल्या अभ्यासाचा परिपाक आहे. इतरा सारखी सर्वसाधारण बुद्धी असली तरी मला बऱ्यापैकी जिज्ञासा आहे. हे असे का? हे बदलू शकत नाही का ?
याची चिकित्सा करून शोध घेण्याची तीव्र इच्छा मला असते. व ती बसू देत नाही.
माझे मत 99% चूक असेल म्हणून मी ते मांडायचेच नाही का? मी नाही तर कोण?आणि आता नाही तर कधी मांडणार?
हा बामणी कावा एका दिवसात कळाला नाही. त्याचं असं झालं की नोकरी करत असता लक्षात आल की पोलीस कर्मचारी हे त्याला मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात पुरेशी सेवा जनतेला देत नाहीत. का?. माझ्या वर्गातील दोन मुले टेल्को मध्ये लागली. दोन मुले पोलीस मध्ये गेली. दिवाळीच्या सुट्टीत भेटल्यावर टेलकोतील मित्र आपले साहेब, कंपनी, नवीन येणारी कार याबद्दल खुशीने, अभिमानाने सांगत तर पोलीस मधील मित्र हे आपलं खातं ,वरिष्ठ अधिकारी,पब्लिक यांच्या बद्दल नाराजीने बोलत. बरं दोघांनाही पगार मिळत असे. मग हे असं का? म्हणून त्यांच्यातल्या मूलभूत मानवी प्रेरणा शोधता याव्यात यासाठी मी फ्राइड,युंग, ऍडलर ते ……. आधुनिक मानसशास्त्रज्ञ अभ्यासले. पोलिस व्यवस्थापन शास्त्र समजण्यासाठी चिनी विचारवंत सूनजू यांचे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेले ‘द आर्ट ऑफ वॉर’ ते आधुनिक शास्त्रज्ञ अभ्यासले. कोणत्या पक्षाचे सरकार आहे व कोण गृहमंत्री आहे याचा देखील अगदी तळाच्या शिपायावर परिणाम होतो हे समजण्यासाठी अरिस्टॉटल, प्लेटो पासून ……, आधुनिक राजकीय विचारवंत अभ्यासले. पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या आर्किऑलॉजी विभागातून मानव उत्क्रांती वाद समजून घेतला व त्याची प्रतिकृती आमच्या कुडाच्या शाळेत उभी केलेली आहे. महत्त्वाचे ईस्टर्न व वेस्टर्न फिलॉसॉपर्स समजून घेत आहे. त्यांच्या नजरेतून मी आमच्या पोलीस कर्मचाऱ्याकडे पाहायला लागलो. माणसाला प्रभावित / कार्य प्रेरित करनारे असंख्य कार्य प्रेरणा सिद्धांत
Motivational theories अभ्यासले. त्याचा वापर तळाच्या कर्मचाऱ्यावर केला. तेव्हा लक्षात आले की 85% पेक्षा जास्त हिंदू म्हणवून घेणाऱ्या बहुजन समाजातील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्य प्रेरणा ही कमकुवत दर्जाची आहे. कारण काय? भारतीय प्रशासकीय यंत्रणा ही इथल्या मूळ सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था आहे.मूळ सामाजिक व्यवस्था कोणती? ती आहे वर्णव्यवस्था. 85 टक्के पेक्षा जास्त हिंदू म्हणवून घेणारे कर्मचारी हे वर वर पाहता म्हणजे बोध मनात स्वतःला भारी समजतात. पण त्यांच्या अंतर्मनामध्ये /अबोध मनामध्ये आपण शूद्र आहोत अशी भावना ठासून भरलेली असते व ती त्यांच्या कार्य प्रेरणेमध्ये दिसून येते. वर वर दाखवताना ते उच्च ब्राह्मण वर्णीय यासारखे दाखवत असले तरी त्यांचे कृतीतील वर्तन व ध्येयवाद शूद्रा सारखाच असतो. आत्मसन्मान self esteem खूप कमी दर्जाचा असतो. आपला शूद्रपणा लपवण्यासाठी त्यातील बरेच जण स्वतःला ब्राह्मण वर्णा सारखे समजून ढोंगी वागतात.जगतात.
स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणारा आमचा धर्म बांधव आमचाच खरा शत्रू का बनला हे ओळखण्याची कोणती क्षमता, अनुभव माझ्याकडे आहे? खरंतर मी बारामती तालुक्यातील जिराईत भागातील शेतकऱ्याचा पोरगा. त्यामुळे शेती आणि 72 च्या दुष्काळात काम केल्याने दारिद्र्य माहिती. मी खेड्यात गाव गाड्यात वाढलो. खरी वर्ण व्यवस्था तिथेच नांदते. त्यामुळे मला भारतातील खेडे माहित. पोलीस मध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. युवक क्रांती दल विद्यार्थी चळवळीत. नोकरीतही माझ्यात 30 टक्के नोकरशहा व 70 टक्के परिवर्तनवादी चळवळ्या जिवंत दिसला.35 वर्ष सनदी अधिकारी म्हणून पोलीस दलात काम केले आणि भारतीय प्रशासन व्यवस्था ही मायक्रो लेव्हलला समजून घेण्याचा प्रयत्न केला. समाज व्यवस्थेला व देशाला दिशा देण्याचे काम राजकीय व्यवस्था करते म्हणून 2014 साली बारामती लोकसभेची निवडणूक लढवली व त्यातून राजकीय व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
प्राथमिक, माध्यमिक शाळा, कॉलेज , गावातील ब्राह्मण भटजी, नोकरीचे ठिकाण, सामाजिक चळवळ, लेखक, मीडिया , राजकारण , यातील इतर जाती/वर्ण यासह स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या लोकांचे निरीक्षण empirical study करण्याची संधी मिळाली.
तसा मी वस्तीवरील भजनातील टाळकुट्या होतो. घर वारकरी संप्रदायाचे. वयाच्या आठव्या वर्षी मी वस्तीवरील वारकऱ्यासह चंद्रभागेत डुबकी मारली होती.
निवृत्तीनंतर तुकाराम पुन्हा वाचला व त्याच्याच खांद्यावर बसून ‘ हे बुडते जन’ माझ्या डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न केला. आणि खोपडी आणखीच सटकली .
भाषण लेखन यात ब्राह्मण शब्द उच्चारू लागल्याबरोबर भल्या भल्या मित्रांनी अघोषित पणे मला बहिष्कृत केले. का ते घाबरतात?
तुकारामाने चारशे वर्षांपूर्वी एका हातात विना व दुसऱ्या हातात चीपळी घेतली होती. स्वतःला आदी पुरुषाच्या मुखातून जन्मलो असे म्हणणाऱ्या ब्राह्मणांना व त्याच्या वेदांना आव्हान दिले. स्पष्टपणे बजावले,
‘वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा
येराने वाहावा भार माथा!!’
स्वतःला सत्वगुणी व भूतलावरील साक्षात देव समजणारांना परंतु त्या विरोधी वर्तन करणारांना तुकारामाने बजावले होते.
अभद्र ब्राह्मण जळो त्याचे तोंड!
काय त्यास रांड प्रसवली !
ज्यांच्यामध्ये बामणी कावा आहे अशा
सर्वच ब्राह्मण मित्रांना सुरुवातीस खाजगी व नंतर समाज माध्यमावरून मी जाहीरपणे प्रश्न विचारले. हलवून खुंटा बळकट केला. आणि लक्षात आले की स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणारा ब्रह्मवृंद हा या समाज व्यवस्थेचा मोठा शत्रू आहे! हा ब्रह्मवृंद साहित्य, सामाजिक कार्य, धर्म, संस्कृती आणि सर्व काही देशासाठी असे सांगत मालक जमात म्हणून संघटित झालेला आहे. ब्राह्मण वर्ण श्रेष्ठत्व व त्यातून करता येणारे शोषण यासाठी हा वर्ग एकीने आणि निकराने लढत आहे.
आज चारशे वर्षानंतर स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणारा परंतु दानवा सारखे कृत्य करणाऱ्या ब्राह्मण राजकारण्याच्या मागे आजही हे बहुजन पालखीचे भोई म्हणून सामील झालेत.
शाहू फुले आंबेडकर बुद्ध यांचे नाव घेत राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण यातील बडे बडे लोक माहीत असूनही ब्राह्मण शब्द उच्चारायला घाबरतात ते का? खरा शत्रू माहीत असून ते आपापसात लढतात. परंतु एकूणच बहुजन समाज सर्वच बाबतीत मागे राहतो ते कसे? अभिजात मराठी च्या नावाखाली साहित्य ब्राह्मणांच्या भल्यासाठी कसे वापरले गेले. जाते. याचा शोध घेऊ या यथावकाश.
_सुरेश खोपडे