पदवी सोबतच छोटे छोटे तांत्रिक कौशल्य पूर्ण करा : राज्यमंत्री बोर्डीकर 

मराठा युवकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यावा : नरेंद्र पाटील 

अर्धापूर येथे हजारो तरुणांच्या उपस्थितीत युवा उमेदवार रोजगार मेळावा 

नांदेड:- विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा अभ्यासक्रम करताना किंवा पदवी झाल्यानंतर कौशल्यपूर्ण एखादा अभ्यासक्रम पूर्ण करावा. ज्यामुळे त्यांना करिअर करणे आणि नोकरी मिळविणे शक्य होईल, अशी सूचना राज्याच्या राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.

भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे आयोजित केलेल्या युवा उमेदवार रोजगार मेळाव्यात श्रीमती बोर्डीकर उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे आयोजित या युवा उमेद रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने युवक -युवती उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण होते. तर विशेष अतिथी म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ.श्रीजया चव्हाण, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माजी आमदार अमर राजुरकर, माजी आमदार अमीता चव्हाण आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना बोर्डीकर यांनी आजचे युग कौशल्याचे असून तुमच्या पदवीसोबतच तुम्हाला रोजगारासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त असणे आवश्यक आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार व आवश्यकतेनुसार आपल्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करावा लागणार आहे. जगात सध्या कौशल्याची मागणी आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त पदवी असून चालणार नाही. तर जगाला हवे असणारे कौशल्यही लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनी देखील अशा पद्धतीच्या कमी कालावधीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती करून नव्या पिढीला कौशल्य प्राप्त करून द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या महामंडळामार्फत मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज परतावा योजना उपलब्ध आहे. म्हणजे थोडक्यात कुणबी मराठा समुदायातील युवकांनी त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रातील उद्योग व्यवसाय उभारावा. या उद्योग व्यवसायात उभारण्यासाठी त्यांना बँकेने जे कर्ज दिले आहेत. त्याचा परतावा सरकार करणार आहे. अत्यंत सोपी ही पद्धत आहे. त्यासाठी युवकांनी पुढे यावे ,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेअंतर्गत अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. नांदेडमध्ये ही मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना केले.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रत्येक काळाची एक गरज असते. श्रीजया चव्हाण यांनी निवडणुकीमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी आजचा रोजगार मेळावा घेतला आहे. शेकडो कंपन्या या ठिकाणी आल्या आहेत. हा उपक्रम आता पूर्ण जिल्ह्यामध्ये हळूहळू राबविल्या जाईल. याशिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग सुरू करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. केवळ नांदेडच नव्हे तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय यावेत यासाठीचे आपले प्रयत्न असून त्यातून युवकांच्या हाताला काम मिळावे, हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जवळपास ४ हजारावर बेरोजगारांची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यांनीही यावेळी संबोधित केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना छोट्या छोट्या नोकरी पासून सुरुवात करा. सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. नंतर दिशा मिळत राहते असे स्पष्ट करून कोणत्याही क्षणी  हार न मानण्याच्या आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन विश्वंधार देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!