बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार

दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही

नांदेड- केवळ बारावीच नव्हे तर आयुष्यात अनेक परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे परीक्षेचा ताण घेऊ नका. तणाव मुक्त व निर्भय वातावरणात परीक्षा द्या,असा शुभेच्छा संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे. सोबतच प्रशासनाने काटेकोर कॉफी मुक्ती अभियान राबविण्याचे निर्देशही दिली आहे.

जिल्ह्यात यावर्षी एकूण 107 परीक्षा केंद्रावर बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीसाठी 172 परीक्षा केंद्राचे नियोजन आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. जिल्ह्यात बारावीसाठी एकूण 24 तर दहावीसाठी 32 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. या संवेदनशील परिक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक बदलण्यात येणार आहेत.

बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण 10 भरारी पथक नेमण्यात आली आहेत. या पथकात उपजिल्हाधिकारी, उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी २ तालुके दिले आहेत. प्रत्येक तालुक्यातून तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांचा तालुका क्षेत्रात भरारी पथक प्रमुख म्हणून कार्य करतील. याशिवाय 24 संवेदनशिल विशेष भरारी पथक म्हणून 5 पेपरसाठी 7 अधिकाऱ्यांचे जिल्हास्तरावरुन नियोजन करण्यात आले आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे भरारी पथक अचानक भेटी देवून परीक्षा सुरळीत पार पडत आहेत की नाही याची पाहणी करतील.

याशिवाय सर्वच 107 केंद्रावर तालुकास्तरावर पूर्णवेळ उपस्थित राहण्यासाठी बैठे पथकाचे नियोजन तहसिलदार यांचे अधिकारात करण्यात आलेले आहे. यामध्ये तालुकास्तरावरील वर्ग-२ एक अधिकारी पथक प्रमुख म्हणून राहतील, त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख, कृषि सहाय्यक यांचे पैकी २ इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी कोणत्याही ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहून कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!