नांदेड(प्रतिनिधी)- किनवट येथे एका 28 वर्षीय महिलेला मोबाईल क्रमांकावर कॉल करून अज्ञात माणसाने तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे असे सांगून ओटीपी पाठविला आणि ओटीपीच्या आधारावर त्या महिलेच्या बॅंक खात्यातून 10 लाख 1 हजार 709 रुपयांची वळती करून फसवणूक केली आहे. आपल्या मोबाईलवर आलेले ओटीपी, एटीएम कार्डच्या मागील सीव्हीसी क्रमांक कोणाला देवू नका असे आवाहन बॅंक नेहमीच करते. तरी पण लोक फसतात हे दुर्देवाच.
सपना श्रीकांत कागणे रा.प्रधानसांगवी किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून अज्ञात व्यक्तीने तुमचे सिमकार्ड बंद होणार आहे असे सांगितले. ते मी होवू देणार नाही तुम्ही मोबाईलवर आलेला ओटीपी मला द्या असे महिलेला सांगितल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी महिलेने त्या अज्ञात व्यक्तीला दिला. त्यानंतर त्या ओटीपीचा वापर करून त्या अज्ञात ठकसेनाने महिलेच्या बॅंक अकाऊंटमधून 10 लाख 1 हजार 709 रुपयांची थेट वळती करून घेवून तिची फसवणूक केली आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 14/2024 नुसार नोंदवली आहे. किनवटचे पोलीस निरिक्षक चोपडे अधिक तपास करीत आहेत.
बॅंका नेहमीच सांगत असतात तुमच्याकडे आलेला ओटीपी, एटीएम कार्डवरील मागच्या बाजूला असलेला सीव्हीसी क्रमांक किंवा तुमचा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका. या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा अशा बातम्या प्रसारीत करीत असतांना त्यात हा उल्लेख नेहमीच केला जातो की, जनतेने सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी अभ्यास करावा, बॅंकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आजही या बातमीसोबत वास्तव न्युज लाईव्ह जनतेला आवाहन करत आहे की, तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक, एटीएम कार्डच्या पाठीमागे असलेला सीव्हीसी क्रमांक, तुमचे अनेक पासवर्ड क्रमांक कोणाला देऊ नका जेणे करून तुमची ऑनलाईन फसवणूक होणार नाही.