नांदेड(प्रतिनिधी)-ईव्हीएम मशीन रद्द करून मतदान पत्रिकेद्वारे महाराष्ट्र विधानसभेच्या फेर निवडणुका घ्या नसता राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेच्यावतीने देण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन जाळून निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांमध्ये 337 जागा महायुतीला कशा मिळतात. त्यामुळे निवडणुक निकालावर सर्वसामान्य नागरीकांचा संशय तयार झाला आहे. अशा घटना जर सातत्याने होत राहिल्या तर देशात निवडणुक कशी लढवावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापुर करून ईव्हीएममध्ये छेड-छाड करून महायुतीत सत्तेत आली आहे. ईव्हीएम मशीनची उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याची गरज आहे. ईव्हीएम मशीनमध्ये बदल करता येतो आणि आपल्याला हवा तसा निकाल लावता येतो असे तज्ञ व्यक्ती सांगत आहेत. मानवाने तयार केलेले यान चंद्रावर उतरते आणि त्याचे नियंत्रण पृथ्वीतील माणसे करतात असे करता येवू शकते म्हणजे ईव्हीएम मशीन सुध्दा मानव निर्माण करतो तिला सुध्दा नियंत्रीत करता येवू शकते. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका रद्द करून बॅलेट पेपर(मतपत्रिका) वापरून नवीन निवडणुका घ्याव्यात. नसता राज्यभर लोकस्वराज्य आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल. यानंतर या आंदोलकांनी ईव्हीएम मशीन जाळून आपला निषेध व्यक्त केला. या निवेदनावर लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे, ओबीसी नेते प्रा.साहेबराव बेळे, कामगार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष व्ही.जी. डोईवाड, गणपत रेड्डी, धोंडोपंत बनसोडे, गंगाधर गायकवाड, गणेश वाघमारे, दिगंबर दिवडे, सचिन वाघमारे, अशोक गायकवाड, सर्जेराव वाघमारे, शिवाजी सूर्यवंशी, आनंदा वाघमारे, श्रीकांत मसलके, सचिन सुर्यवंशी, अंबादास भंडारे, अर्जुन गायकवाड, सुनिल जाधव, मारोती घोरपडे, सौ.संगिता पवळे, श्रावण गागलवाड, गणेश धुमाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.