नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील पडद्यामागे राहुन निवडणुकीचे काम करणाऱ्या नांदेड जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी केलेल्या कामाबद्दल पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांना शाब्बासकीची थाप दिली आहे. असाच प्रकार अर्धापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांनी केला आहे.
निवडणुकीचे काम करतांना निवडणुक आयोगाकडून मतदान केंद्रावर काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांना 250 रुपये रोज मजुरी दिली. पण निवडणुकीचा पुर्ण आलेख, निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते मतमोजणीपर्यंत मेहनत घेणारी टिम ही जिल्हा विशेष शाखा असते. या शाखेत पोलीस निरिक्षक शामसुंदर टाक आणि समाधान चवरे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. पडद्या मागे राहुन कोणालाही कळत नाही असे काम विशेष शाखा करत असते. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी या शाखेचा गौरव करत त्यांना शाब्बासकीची थाप दिली आहे.
असा प्रकार अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी सुध्दा केला आहे. कोणताही बंदोबस्त करतांना पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकारी व अंमलदारांना बिनतारी संदेशावर शाब्बास अशा सुचना करून त्यांचा उत्साह वाढवतात ही प्रथा आहे. पण 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक विष्णु कऱ्हाळे, पोलीस उपनिरिक्षक बाबूराव जाधव यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अंमलदारांना शाल, पुष्प आणि मिठाई देवून त्यांचा सन्मान केला. ही घटना नक्कीच दखल योग्य आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्यसा कनिष्ठाला अशा प्रकारे उत्साहवर्धक कृती केली तर त्याची काम करण्याची क्षमता जास्त वाढते.