नांदेड-अलिकडे माणसांच्या मेंदूतील जातजाणीवा आणि धर्मजाणिवा नको तेवढ्या प्रखर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संतांच्या साहित्याचे पूर्नमुल्यांकन होणे आवश्यक आहे. संतांनी गतकाळात सामाजिक अभिसरणात अद्वितीय काम केले आहे. संतांच्या जीवनातील चमत्कार बाजूला काढून पाहिले तर चमत्कार वाटावा एवढे चांगुलपण संतांच्या ठायी होते याचे पण आकलन झाले पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले. संत नामदेवाच्या ७५४ व्या जयंती निमित्त कार्तिकी एकादशीच्या दिवशी नांदेडच्या मेरू शिंपी समाजाच्यावतीने आयोजित ” संत नामदेवाचे लोकोत्तर कार्य ” या विषयावर ते व्याख्यान देत होते. गोदावरी काठी गायत्री मंदिराशेजारी असलेल्या संत नामदेव मंदिरातील सभागृहात ते बोलत होते. यावेळी मंचावर मेरू शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री शंकर शिंगेवार, सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण संगेवार, घुमान यात्रेचे आयोजक श्री पंढरीनाथ बोकारे, लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे संयोजक श्री दिगंबर कदम, ग्रामीण लेखक श्री महेश मोरे, कवी श्री मारुती मुंडे आणि श्री गजानन देवकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री फुलारी यांनी संत नामदेवांनी महाराष्ट्र आणि पंजाब विशेषतः उत्तर भारताचा केवळ भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक अनुबंध अर्थपूर्ण केला. संतांना इहवादी भूमिकेतून पाहणे ही आता काळाची गरज असल्याचे सांगितले.
आपल्या व्याख्यानात श्री फुलारी यांनी संत नामदेवांच्या संबंधित चमत्काराचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अन्वयअर्थ लावला व आद्य चरित्रकार आणि ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले संत नामदेवांचे व्यक्ती आणि वाग्ड़मय रसिकांसमोर उभे केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लक्ष्मण संगेवार यांनी पन्नास वर्षापूर्वी नांदेड येथे स्थापना झालेल्या संत नामदेव महाराज मंदिराचा पूर्वइतिहास तसेच सध्या कार्यरत विविध उपक्रमाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात श्री महेश मोरे, श्री दिगंबर कदम, श्री पंढरीनाथ बोकारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. गणेश नोमुलवार यांनी केले तर आभार श्री सतीश सिंगेवार यांनी मानले. या व्याख्यानास अनेक शिख बांधव, साहित्यिक रसिक, समाज बांधव व महिल्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर उपस्थित होते. जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबीर, भजन ई. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचीव श्री विनोद शिंगेवार, अभय भुरेवार, भारत यन्नावार, गजानन पोटपल्लेवार, किशोर नोमुलवार आणि सौ. ज्योती शिंगेवार यांच्या नेत्वृवातील महिला भजनी मंडळ तसेच युवा शिंपी मंडळाच्या सदस्यांच्या विषेश प्रयत्न व सहकार्याने मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाईची सजावट केली होती. महा अरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.