नांदेड(प्रतिनिधी)-सेवादासनगर तांडा ता. मुखेड येथे काही गाड्यांना आग लावणाऱ्या दोन जणांना मुखेड पोलीसांनी त्वरीत जेरबंद केले आहे. यातील एक गाडी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराची आहे. त्याने स्वत:च आपली गाडी जाळली आहे.
दि.2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलीसांना दुरध्वनीवरून अशी माहिती मिळाली की, सेवादासनगर तांडा जो मुखेड ते बाऱ्हाळी रस्त्यावर आहे. तेथे निवडणुकीतील अपक्ष उमेदवार परसराम कदम यांच्या गाडीवर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळल्याची माहिती प्राप्त झाली. तेंव्हा मुखेडचेग पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरिक्षक मंचक फड, पोलीस अंमलदार पांडूरंग पाळेकर, व्यंकट जाधव, भास्कर मुंडे, किरणकुमार वाघमारे, गणेश पवार, सिध्दार्थ वाघमारे, मारोती मेकलवाड, प्रदीप शिंदे, सुरेश गजलवाड आदी सेवादासनगर तांडा येथे गेले. पोलीसांनी परसराम कदम व त्यांचा पुतण्या अक्षय कदम यांना विचारणा केली असता त्यांनी आमची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एल 2775 कोणीही जाळली नाही आम्हीच प्रसिध्दीसाठी जाळली आहे असे सांगितले. या दोघांनी केलेल्या कृत्याबद्दल पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांनीच तक्रार दिली. त्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम 287, 217, 324(4), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 344/2024 दाखल केला आहे. या गाडीचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी आदींनी काही मिनिटांमध्ये खरे शोधणाऱ्या मुखेड पोलीसांचे कौतुक केले आहे.