नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचा संवाद

*महिला सशक्तिकरण अभियान मेळावा* 

 *हजारो महिला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणार* 

 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती* 

नांदेड – महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा लाभार्थ्यांचा आनंद मेळावा उद्या रविवारी 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अंतिम आढावा घेतला.

संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. उद्या जवळपास 250 बसेस याशिवाय शेकडो खाजगी वाहनाने जिल्ह्याच्या सर्व भागातून महिला उपस्थित राहणार आहे. एकट्या नांदेड शहरातून हजारो महिलांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड महानगरपालिका व नागपूर ग्रामीण भागातील यंत्रणा यासाठी प्रयत्न करत असून आज महिलांना सुरक्षित आणणे, त्यांच्या खाणपणाची व्यवस्था करणे, त्यांच्या पार्किंगची व बैठक व्यवस्था करण्याबाबतची सूचनाही करण्यात आली.

राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी १३ ऑक्टोबरला नांदेड येथे महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत.

नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

*विविध मान्यवरांची उपस्थिती*

या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती असणार आहे.

आज आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील तयारीचा आढावा घेतला. त्यांनी नवा मोंढा मैदानाला भेट देऊन बैठक व्यवस्था व पार्किंग संदर्भातील माहिती घेतली.

 

*विविध योजनांच्या लाभार्थ्यांची उपस्थिती*

जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

 

*वाहनतळाची व्यवस्था*

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनाचे लाभार्थी व नागरिक यांची मोठया संख्येने येणार असून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने 249 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससाठी नांदेड शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर नांदेड मनपा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी 170 बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी एकूण 129 बसेस पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठीही नियोजन केले आहे.

 

*माध्यम प्रतिनिधीसाठी व्यवस्था*

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी प्रशासनाच्यावतीने सुक्ष्म नियोजन केले असून कार्यक्रमासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधीसाठी त्यांच्या वृत्तपत्र व वाहिन्यांच्या ओळख पत्रावर पत्रकार कक्षापर्यंत प्रवेश मिळणार आहे. या ठिकाणी वेगळी आसन व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक योजनेचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येणार असून त्यांच्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य मंडपाची व्यवस्था केली आहे.

*असा असेल कार्यक्रम*

दुपारी अकरा वाजल्यापासून जिल्हाभरातून येणाऱ्या भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पैठणीच्या वाटपाचा कार्यक्रम देखील होणार आहे. महिलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील या ठिकाणी होणार आहे. जागेवरच होणाऱ्या या स्पर्धेत उद्या शेकडो पैठणीचे वाटपही केले जाणार आहे.

दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होईल.त्यानंतर गोमाता पूजन व या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्टॉलची उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक कळ दाबून होईल. त्यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रॅम्पवरून मुख्यमंत्री व मान्यवर लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर विविध लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, धनादेश वाटप व सत्कार केला जाणार आहे.दुपारी तीनच्या सुमारास मान्यवरांच्या भाषणांना सुरुवात होईल.साडेतीन वाजता मुख्यमंत्री सभेला संबोधित करतील.सभास्थळावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 4.30 वाजता मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण प्रयाण करतील 4.45 शासकीय विमानाने नागपूरकडे ते प्रयाण करतील.

 

*फेसबुक पेजवर लाभार्थी*

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्या ” *जिल्हा माहिती कार्यालय नांदेड* ” या फेसबुक पेजवर आपल्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया उपलब्ध करण्यात आल्या आहे. याशिवाय उद्या या सर्व लाभार्थ्यांच्या मुलाखती या ठिकाणी दाखविल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!