हदगाव(प्रतिनिधी)-लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा करून शासनाने राज्यातील लाखो महिलांना 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली. अजूनही ती रक्कम देणे सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा असाच बोजवारा उडत असतो. त्यात महिलांच्या नावावर पुरूषांचे आधारकार्ड, बॅंक पासबुक जोडून ती रक्कम बनावटपणे उचलणाऱ्या लोकांविरुध्द अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातही मनाठा पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीला हदगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र माने यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात या आरोपीचा भाऊ अगोदरच अटक करण्यात आलेला आहे.
मनाठाचे मंडळाधिकारी अरुण पांडूरंंग गिते यांनी 30 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मनाठा येथील सचिन मल्टीसर्व्हीसेस सेंटर नावाचे ग्राहक सेवा(सीएससी) येथे दि.1 ऑगस्ट 2024 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान सीएससीचे चालक सचिन भुजंग थोरात(32) आणि त्यांचा भाऊ सुनिल भुजंग थोरात(30) या दोघांनी शासनाची आणि जनतेची फसवणूक केली. यातील सचिन भुजंग थोरातला 4 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते.
एसबीआय बॅंक शाखा हदगाव व ए.यु.फायनान्स नांदेड आणि आयडीएफसी बॅंक आनंदनगर नांदेड, एक्सीस बॅंक नांदेड यांना पत्रव्यवहार करून पोलीसांनी घेतलेल्या माहितीनुसार थोरात बंधुंनी केलेल्या घोटाळ्याची सर्व माहिती जमवली. या घटनाक्रमात 16 पुरूषांच्या नावावर त्यांचे बॅंक खाते आणि आधार आयडी बनावट बनवून प्रत्येकाच्या नावावर शानाकडून आलेलेले 4500 रुपये परत घेतले. त्यातील काही जणांनी पैसे दिले पण नाही. अशा प्रकारे लाडक्या बहिण योजनेचा फायदा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही तर कलाकार भावांनी मिळवला. या संदर्भाने मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 167/2024 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
उमाकांत पुणे यांनी सुनिल भुजंग थोरातला 9 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.33 वाजता अटक केली आणि दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीस तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक का आहे याचे सविस्तर विवेचन सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश रामचंद्र माने यांनी सुनिल भुजंग थोरातला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.