नांदेड ऑलिम्पिक असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे मागणी; क्रीडा विभागाच्या ५ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी दि 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर विविध संघटना व खेळाडू अंतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रीडा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या शासन निर्णयामुळे १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकविजेते ठरलेल्या खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयाचा फेरविचार करून शालेय स्तरावरील पात्र खेळाडूंना पूर्वीप्रमाणेच ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ कायम ठेवण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्री किरण अंबेकर यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी नांदेड जिल्हा ऑलम्पिक असोसिएशनचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले , उपाध्यक्ष टि.एन रमनबैनवाड, बाबुराव खंदारे ,कोषाध्यक्ष प्रा .जयपाल रेड्डी, सहसचिव डॉ. राहुल वाघमारे , प्रभाकर पेटवडजकर संघटना महासचिव बालाजी पाटील जोगदंड यांची प्रमुख उपस्थीती होती .निवेदनात क्रीडा आरक्षण धोरणामुळे राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, नवीन शासन निर्णयातील पात्रता निकषांमुळे शालेय स्तरावर मेहनत घेऊन जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शालेय खेळाडूंच्या मेहनतीला न्याय मिळावा १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय स्पर्धा या खेळाडूंच्या क्रीडा कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या वयात खेळाडू शारीरिक क्षमता, कौशल्य, शिस्त आणि मानसिक तयारी विकसित करून उच्चस्तरीय स्पर्धांसाठी स्वतःला तयार करतात. अशा खेळाडूंना भविष्यातील नोकरीच्या संधींबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागल्यास ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील खेळाडूंचा उत्साह कमी होण्याची भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे. असोसिएशनच्या शासनाकडे प्रमुख मागण्या १. दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून खेळाडूंच्या हिताचे संरक्षण करावे. २. १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये पात्रतेनुसार पदके मिळविणाऱ्या खेळाडूंना पूर्वीप्रमाणे ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ कायम ठेवावा. ३. ऑलिम्पिक स्पर्धांमधील सन २००५ नंतर सलग तीन ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांबाबतची अट रद्द करावी. ४. वयोगट, स्पर्धेचा स्तर, पदकप्राप्ती आणि अधिकृत मान्यता यानुसार पात्रतेचे निकष स्पष्ट निश्चित करावेत. ५. नवीन तरतुदींमुळे पूर्वीच्या धोरणानुसार पात्र ठरणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये, यासाठी संक्रमणकालीन तरतुदी कराव्यात. ६. क्रीडा आरक्षणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात. ७. खेळाडू, प्रशिक्षक, पालक, शालेय क्रीडा संघटना व मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. ८. आवश्यक असल्यास शासन निर्णयात सुधारणा करून स्वतंत्र स्पष्टीकरण जारी करावे. खेळाडूंच्या भवितव्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा शालेय स्तरावर पदके मिळविण्यासाठी खेळाडू अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतात. त्यांच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळणे आणि भविष्यातील संधी सुरक्षित राहणे आवश्यक आहे. केवळ सुवर्णपदक विजेत्यांपुरते आरक्षण मर्यादित न ठेवता आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेत्यांनाही त्यांच्या पात्रतेनुसार न्याय मिळावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. याच मागणीसाठी विविध क्रीडा संघटना , खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. या निवेदनाच्या प्रती क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालय लातूर विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांनाही पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. या निवेदनावर ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडचे चेअरमन जे. ई. गोपिले, अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महासचिव बालाजी पाटील जोगदंड आणि कोषाध्यक्ष प्रा. जयपाल संभाजी रेड्डी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खेळाडूंच्या मेहनतीचा सन्मान राखणे ही शासनाची जबाबदारी असून, गुणवंत खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ऑलिम्पिक असोसिएशन नांदेडच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 328 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रत्नागिरी येथे रणजी क्रिकेटपटू सुनील जाधव आणि सुनील यादव यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान !