रोख रक्कम, चार वाहने, नोटा मोजण्याचे मशीन व तीन स्कॅनर मशीन पोलिसांच्या ताब्यात देवणी (प्रतिनिधी) – देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानमाळा येथे सुरू असलेल्या कथित जुगार क्लबवर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, ११ लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहने तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य, असा एकूण १२ लाख ६९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ९ सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. गुरुनाथ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून रायडर क्लब या नावाने मनोरंजन क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या क्लबमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून दररोज सुमारे २०० वाहने घेऊन लोक जुगार खेळण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाली होती. माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांचे पथक देवणीकडे रवाना करण्यात आले. रात्री सुमारे ९.३० वाजता पथक क्लब परिसरात पोहोचले असता मोठ्या प्रमाणावर लोक जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी तेथून पळ काढला. क्लबमधून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग असल्याने अंधाराचा फायदा घेत काही जुगारी पसार झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी चारचाकी वाहने, रोख रक्कम, तीन स्कॅनर मशीन, कॉईन ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे तीन स्टीलचे बॉक्स, प्लास्टिकचे कॉईन आदी साहित्य जप्त केले. नोटा मोजण्याचे मशीनही जप्त पोलिसांच्या धाडीत भारत पे कंपनीचे तीन नोटा मोजण्याचे स्कॅनर मशीन आढळून आले. क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असल्याचे या मशीनच्या तपासणीतून स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जुगाऱ्यांसाठी मद्याचीही व्यवस्था या क्लबमध्ये येणाऱ्या जुगाऱ्यांसाठी मद्यसेवनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचेही कारवाईत समोर आले. धाडीदरम्यान क्लबमध्ये दारूने भरलेले पाच ग्लास पोलिसांना आढळून आले.या प्रकरणी क्लबचे अध्यक्ष प्रमोद विद्यसागर धुमाळे (रा. शिरूर अनंतपाळ) तसेच एम. रामाराव (रा. हैदराबाद) यांच्याविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यासह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसाळे, गणेश राठोड, गजानन डवरे आदींनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. खबर हेल्पलाइनवर माहिती द्या अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून ‘खबर’ हेल्पलाइन 91 50 100 100 सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 51 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकर-नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी