राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समाजबांधवांचा एल्गार; व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या नांदेड बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्याने प्रमुख भागांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. व्यापारी, सामाजिक संघटना, शिक्षण संस्था तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होत मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. सकल मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला. सिडको, हडको, तरोडा नाका, भावसार चौक, आयटीआय, शिवाजीनगर, नवा मोंढा, वजीराबाद, जुना मोंढा यासह विविध भागांतील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये दिवसभर शांतता दिसून आली. बंदचा परिणाम वाहतूक आणि शैक्षणिक क्षेत्रावरही जाणवला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात घटली होती. काही खासगी शाळा व शिक्षण संस्थांनी सुट्टी जाहीर केली, तर अनेक कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्यात आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे तसेच बसस्थानक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली बंदच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. राज कॉर्नर येथून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर आयटीआय मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव, नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रॅलीदरम्यान सहभागी समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. शांततेत पार पडलेल्या या रॅलीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडकरांचा ठाम पाठिंबा व्यक्त झाला. Kanthak Suryatal Post Views: 631 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation क्रीडा दिनानिमित्त धनुर्विद्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद आम्ही दुःख सांगत होतो, निष्ठुर मंत्री हसत गाडीत बसले! – आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप आणि महाराष्ट्राला सुन्न करणारा लढा!