नांदेड (विशेष प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे दैवी आणि अलौकिक अधिकार लाभलेल्या आमच्या स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) कीर्ती सध्या सर्वदूर पसरली आहे. हवेत संशयाचा वास घेऊन एखादे गावठी पिस्तूल जप्त करणे, संशयित दुचाकी गाडी पकडणे आणि आरोपीला चौकशीसाठी म्हणजेच सर्दी साठी (कोठडीत) पाठवण्याची अत्यंत जलद कार्यवाही करणे यात या शाखेचा हात संपूर्ण जिल्ह्यात कोणीही धरू शकत नाही. परंतु, याच वेगवान कार्यपद्धतीचा डंका वाजवणाऱ्या आमच्या लाडक्या गुन्हे शाखेला गेल्या दोन महिन्यांपासून एका अतिविचित्र आणि कोड्यात टाकणाऱ्या आव्हानाने चांगलेच जेरीस आणले आहे. झालं असं की, तब्बल दोन महिन्यांपूर्वी थेट एका पोलीस ठाण्यातूनच एका खाकी वर्दीतील गरीब पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला गेली. आता सामान्य जनतेची वाहने चोरीला गेली की तपास सुरू आहे चे छापील उत्तर मिळणे नित्याचेच असते, पण इथे तर साक्षात कायद्याच्या रखवालदाराची हक्काची गाडी गायब झाली! जिल्ह्याचा अफाट भूभाग पिंजून काढून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे गुन्हे शाखेचे अनेक कर्तबगार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या चोरीला गेलेल्या दुचाकीचा साधी नंबर प्लेट किंवा थांगपत्तासुद्धा शोधू शकलेले नाहीत. काय म्हणावे आता या अचाट कामगिरीला? या अनाकलनीय अपयशाचे मूळ कारण जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलीस दलातील अत्यंत गोड वास्तव समोर आले. गुन्हे शाखेतील हुशार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज सध्या चोरांचा माग काढण्यापेक्षा एका अत्यंत क्लिष्ट आणि बौद्धिक कामात व्यस्त आहे. ते काम म्हणजे वेगवेगळ्या मार्गांनी जमा होणाऱ्या ‘मोदकांचा’ अचूक हिशोब करणे! कोणत्या पोलीस ठाण्यातून किती मोदक आले आणि त्यांची वेगवेगळ्या प्रकारे कशी विभागणी करावी, या अत्यंत महत्त्वाच्या व्यवहारात व्यस्त असलेल्या या महाभागांना एका गरीब पोलिसाच्या चोरीला गेलेल्या दुचाकीमध्ये काय रस असणार आणि का म्हणून त्यांनी त्यात आपला वेळ वाया घालवावा? नांदेड जिल्हा भूभागाच्या दृष्टीने तसा बराच मोठा आणि विस्तीर्ण आहे. अशा मोठ्या जिल्ह्यात ३६ पोलीस ठाण्यांचे अफाट साम्राज्य सांभाळताना एलसीबीच्या व्यस्त अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच सहकाऱ्याची मोटारसायकल शोधत वेळ घालवणे म्हणजे त्यांच्या बहुमूल्य वेळेचा अपव्ययच म्हणावा लागेल. शेवटी, दिवाखाली अंधार म्हणतात तो हाच! गावठी पिस्तूल पकडून स्वतःची पाठ थोपटून घेणे सोपे आहे, पण स्वतःच्या नाकाखाली झालेली चोरी उघडकीस आणण्यात कसले आले आहे ग्लॅमर? एलसीबीचा हा प्रताप म्हणजे पोलीस दलातील समांतर अनागोंदी कारभाराचा उत्कृष्ट नमुना आहे, याबद्दल कोणाचे दुमत नसावे. Kanthak Suryatal Post Views: 1,313 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एथॅनॉलची कडू किंमत: भारतातील साखर संकट आणि सर्वसामान्यांच्या खिशाला लागलेली कात्री संसदेचं सत्रावसान का रखडलं? १५ सप्टेंबरला पुन्हा आणीबाणीचे विशेष सत्र? काय आहे मोदी-शहांचा मेगा प्लॅन