किनवट (नांदेड) – बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने सेवानिवृत्त व्यक्तीच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना किनवट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शामराव मोतीराम जाधव (वय ६०), रा. आंबाडी तांडा, ता. किनवट, यांचे कॅनरा बँक शाखा किनवट येथे खाते आहे. त्यांच्या या खात्यात एकूण २० लाख रुपये जमा होते. ११ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना ७६९६५७९७६१ या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने तुमचा फोन हँग होत आहे, त्यामुळे बँकेशी लिंक असलेले सिम कार्ड तुमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये टाका, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मुलाला धमकावून मिळवला ओटीपी फिर्यादीने सिम कार्ड मुलाच्या मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्यावर ओटीपी (OTP) आला. त्यानंतर त्या भामट्याने फिर्यादीच्या मुलाला फोन करून मी बँक ऑफिसर बोलत आहे, तुमच्या खात्यातील ५ लाख रुपयांची एफडी (FD) केली आहे, असे सांगितले. यावेळी आरोपीने माझ्यावर तुमचा विश्वास नाही का? असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली आणि मुलाला शिवीगाळ करत दबाव टाकला. ५ लाख रुपये लंपास १२ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादीच्या खात्यातून ५ लाख रुपये कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात व्यक्तीने फसवणूक करून ही रक्कम परस्पर काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६C, ६६D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कराड हे स्वतः करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी फोनवर विश्वास ठेवू नये आणि आपला ओटीपी कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 174 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मधुबारमध्ये चोरट्यांची नाईट पार्टी; दारूच्या बाटल्यांसोबत रोकडही लंपास! किनवटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त