हिमायतनगर (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत हिमायतनगर पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. कोतलवाडी जाणाऱ्या रोडलगत शेतातील आखाड्यावर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे २ लाख १८ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिस पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्या काही जणांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळ काढला, तर काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईत १८ हजार ३४० रुपये रोख, जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. मोटारसायकलींची अंदाजे किंमत दोन लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात विठ्ठल काशीनाथ नारखेडे (वय ४३), अरविंद मारुती सूर्यवंशी, विनायक नारखेडे यांच्यासह अन्य ५ आरोपींविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार श्याम नागरगोजे आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध जुगार, मटका, तिरट तसेच अन्य बेकायदेशीर धंद्यांविरोधात जिल्ह्यात कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईमुळे हिमायतनगर परिसरातील अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या विशेष मोहिमेमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 713 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शासकीय कामात अडथळा; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांवर डीआयजी पथकाची धाड; १२ जणांवर कारवाई, ३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त