नांदेड (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नांदेड शहरातील एका 59 वर्षीय व्यक्तीची तब्बल 1 लाख 62 हजार 500 रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस सायबर ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत रिव्हिशा निवास, विसावा नगर, नांदेड येथे राहणारे फिर्यादी शिरीष बाबुलाल कासलीवाल (वय 59) यांना शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपी रूप बुशरा, शिवाणी गेरा तसेच कोलक्षेप ग्रुप अँडमिन यांनी संगनमताने फिर्यादीकडून विविध माध्यमांतून 1,62,500 रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवलेली रक्कम परत न करता तिचा अपहार करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस सायबर पोलीस ठाणे, नांदेड येथे गुन्हा क्रमांक 06/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 316(2), 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोने करीत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील किंवा व्हॉट्सअप, टेलिग्रामवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवू नये, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 616 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलिसांची अवैध गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : १५ दुचाकी जप्त; ७.६२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत