नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात अनेक शूरवीर होऊन गेले असतील, पण तानाजी येळगे (बक्कल नंबर १६०१) यांच्यासारखा दुर्मिळ हिरा शोधूनही सापडणार नाही. तानाजी येळगे साहेबांची कीर्ती अशी की, त्यांच्याशिवाय जणू नांदेडचा गुन्हेगारीचा डोलारा कोसळून पडेल की काय, अशी भीती प्रशासनाला वाटत असावी. म्हणूनच की काय, साहेबांची नियुक्ती अशा स्टाक फोर्स मध्ये करण्यात आली आहे, जिथे गणवेश घालण्याचे साधे कष्टही घ्यावे लागत नाहीत. अहो, ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश इतका प्रखर आहे, त्यांना त्या खाकी वर्दीच्या आवरणाची गरजच काय? नुकतीच एक बातमी वाचनात आली की, दोन पोलीस निरीक्षक आणि एका सहाय्यक पोलीस निरीक्षकका सह अनेक पोलीस अंमलदार मोठ्या ताफ्यात आपले तानाजी येळगे आणि त्यांचे काही सवंगडी सामील झाले आणि त्यांनी चक्क किलोभर नव्हे, तर ६ किलो गांजा पकडण्याचा पराक्रम केला. खरं तर, या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही की, एवढ्या मोठ्या फौजफाट्यात तानाजी येळगे साहेबांचे असणे म्हणजे जणू एखाद्या मोठ्या चित्रपटामध्ये सुपरस्टारची एन्ट्री असावी, तसंच काहीसं हे आहे. गांजा पकडणे ही तर फक्त एक झलक आहे; साहेबांचा खरा दरारा तर वाळू माफियांमध्ये गेल्या १० वर्षांपासून आहे. तानाजी येळगे साहेबांच्या कार्यशैलीचे कौतुक करावे तितके थोडेच. गुन्हे शाखेत एकाच ठिकाणी तब्बल १० वर्षे ठाण मांडून बसणे, हे काही येड्यागबाळ्याचे काम नाही. याला तपस्या म्हणतात. वाळू माफियांच्या गराड्यात राहून, त्यांच्यावर कार्यवाही (की काय म्हणतात त्याला?) करताना साहेबांनी जे कौशल्य दाखवले आहे, ते पाहून वाटतं की, वाळू आणि तानाजी येळगे साहेबांचे काहीतरी अतूट नाते असावे. १० वर्षे एकाच खुर्चीला चिकटून राहण्याचे फेविकॉल साहेबांना नक्कीच गवसले आहे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही महिन्यांपूर्वी या स्टारला माहूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. आता माहूर म्हणजे नांदेडपासून दूर, डोंगराळ भाग. तिथे साहेबांना वर्दी घालून सामान्य पोलिसांसारखं काम करावं लागलं असतं, जे त्यांच्या प्रतिभेला साजेसं नव्हतं. पण साहेब म्हणजे साहेबच! त्यांच्या डोक्यावर कुणाचा तरी असा काही वरदहस्त आहे की, माहूरची हवा त्यांना काही मानवली नाही. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी असा काही चमत्कार घडवला की, पुन्हा एकदा त्यांची रवानगी नांदेडच्या त्याच आरामदायी टास्क फोर्समध्ये झाली, जिथे गणवेशाची कटकट नाही आणि मुख्यालयाचे नंदनवन जवळ आहे. नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अशा काही मोजक्या रत्नांची खाणच आहे. तानाजी येळगे साहेब तर केवळ एक प्रतिनिधी आहेत; त्यांच्यासारखे अनेक महाभाग तिथे आहेत, ज्यांनी भरती झाल्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्या सोडलेल्याच नाहीत. या मंडळींना बाहेरच्या पोलीस ठाण्यात काम करणे म्हणजे जणू वनवासाला जाण्यासारखे वाटते. की काय माहीत, कदाचित त्यांची सेवा आणि जी हुजुरी एवढी उच्च दर्जाची असावी की, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना आपल्या डोळ्यासमोरून दूर करणे शक्यच होत नसावे. आता प्रश्न असा पडतो की, प्रत्येक पोलिसाला तर सर्व प्रकारची कामे यायला हवीत, असे नियम सांगतात. पण नियमांचे काय, ते तर मोडण्यासाठीच असतात, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे वरदहस्त असतो. एकाच ठिकाणी, एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीत राहून, त्यांच्या जी हुजुरीमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणे, यालाच जर कर्तव्य मानले जात असेल, तर मग सामान्य जनतेने कुणाकडे बघायचे? गणवेश न घालता, जिल्हाभर योग्य काम करण्याचे जे स्वातंत्र्य तानाजी साहेबांना मिळाले आहे, ते पाहून इतर प्रामाणिक पोलिसांना नक्कीच वाटत असेल की, आपणही अशीच एखादी मर्जी संपादन करायला हवी होती. अखेर, तानाजी येळगेआणि त्यांच्यासारख्या इतर लाडक्या पोलिसांमुळे हे सिद्ध झाले आहे की, पोलीस दलात न्याय्य पद्धतीने काम करण्यापेक्षा योग्य ठिकाणी आणि योग्य माणसांच्या सानिध्यात राहणे जास्त फायदेशीर ठरते. साहेबांच्या या थोर कामगिरीला आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या त्या अदृश्य हाताला सलाम! जिल्ह्याचा गांजा पकडला जावो किंवा वाळू चोरीला जावो, पण तानाजी येळगे साहेबांचा स्टार असाच विना-गणवेश चमकत राहो, हीच सदिच्छा! Kanthak Suryatal Post Views: 1,930 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुल्ली जज बनली आहे, म्हणून हिंदूंना तुरुंगात धाडतेय;देशभरात हत्याकांड घडवण्याची धमकी उज्जैन जमीन घोटाळा: २५३ एकर, १३७ भूखंड आणि मुख्यमंत्र्यांचे कुटुंब