नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात गेल्या काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ठाणोसिंग चव्हाण यांची अखेर परभणी जिल्ह्यात रवानगी करण्यात आली आहे. 19 जूनच्या रात्री झालेल्या या बदलीने पोलीस वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ही बदली केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी परवानगी न घेता शेजारच्या तेलंगणा राज्यात झालेला त्यांचा प्रवास चांगलाच चर्चेत आला होता. सरकारी नियमांचे पुस्तक वाचण्यासाठी असते की कपाटात ठेवण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रकरणाने अखेर बदलीच्या फाइलला वेग दिल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात ऐकू येत आहे. यापूर्वी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुबीर पोलीस ठाण्यात परमेश्वर चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांबाबत घडलेल्या घटनेची बातमी माध्यमांत झळकली होती. त्या वृत्ताचा काही परिणाम होणार नाही, असे वाटत असतानाच अचानक बदलीचे आदेश निघाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, गुटखा प्रकरणे, फसवणुकीचे गुन्हे, मालमत्तेशी संबंधित तपास अशी अनेक महत्त्वाची प्रकरणे त्यांच्या ताब्यात होती. एवढ्या अपरिहार्य अधिकाऱ्याला इतक्या घाईघाईने हलविण्याची वेळ का आली, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे. काही जण तर मिश्कीलपणे म्हणत आहेत की, इतवारा पोलीस ठाण्यातील खुर्च्यांनाही आता त्यांच्या अनुपस्थितीची सवय लावावी लागणार आहे. दरम्यान, गुन्हे शोध पथक प्रमुखाची जागा रिकामी झाली असून आता या खुर्चीवर कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ही केवळ पदाची जागा नाही, तर जबाबदारी, प्रतिमा आणि कार्यपद्धतीची कसोटी आहे. नवीन अधिकारी कोणताही असो, त्याने जुन्या घटनांचा अभ्यास करून नव्या पद्धतीने कामाची आखणी करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रसिद्धी मिळविण्याचे अनेक मार्ग असतात; मात्र अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षमतेने, निष्पक्ष तपासाने आणि जनविश्वासाने नाव कमावणे अधिक महत्त्वाचे असते. नांदेड जिल्ह्यातील कारकिर्दीत परमेश्वर ठानुसिंग चव्हाण अनेक कारणांनी चर्चेत राहिले. मात्र पोलीस दलातील जाणकारांचे मत स्पष्ट आहे.आता परभणी जिल्ह्यात काम करतांना चव्हाण यांनी पोलीस दलाची मान उंचावेल असे कार्य करून आपल्याला मिळालेली ख्याती कायम ठेवावी अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्याची खरी ओळख चर्चांमुळे नव्हे, तर त्याच्या कामगिरीमुळे निर्माण झाली पाहिजे. आता इतवाराच्या नव्या पर्वात हा धडा किती जण लक्षात ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संबंधित बातमी …. नियम धाब्यावर बसवून पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाणांचा तेलंगणा दौरा? विनापरवानगी तपासाचा धडाका पुन्हा चर्चेत! Kanthak Suryatal Post Views: 927 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पुन्हा हादरले; शेख शमीम शेख इसाक यांच्या हत्येने शहरात खळबळ भाजपची रणनीती आणि कॉकरोच पार्टीचा संघर्ष: स्वकीयांनीच विणलेल्या जाळ्यात अडकलेले सरकार