स्वागत आहे तुम्हा सर्वांचे या महान लोकशाहीच्या अशा एका पर्वात, जिथे सरकारकडे सर्व काही मुबलक आहे, पण जनतेच्या नशिबात मात्र फक्त रांगा आहेत! सध्या उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवर जे काही सुरू आहे, ते पाहून कोणालाही वाटेल की आपण पुन्हा एकदा बैलगाडी युगाकडे जाण्यासाठी डिजिटल झेप घेत आहोत. सब चंगा सी आणि रिकामे पेट्रोल पंप पंतप्रधान मोदीजी देशाला आवाहन करत आहेत की, सोने-चांदी खरेदी करू नका, पेट्रोल जपून वापरा, परदेश दौरे टाळा.किती हा त्याग! देश संकटात असल्याचे संकेत स्वतः पंतप्रधान देत आहेत, तर दुसरीकडे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छाती ठोकून सांगत आहेत की, घाबरू नका, पेट्रोलचा महापूर आला आहे, अजिबात टंचाई नाही. आता प्रश्न असा पडतो की, जर पेट्रोल मुबलक आहे, तर नेपाळ सीमेवरील ६०० किलोमीटरच्या पट्ट्यात ६०% पेट्रोल पंप टाळे लावून का बसले आहेत? बहुधा ते अमृत काळातील ध्यानधारणेसाठी बंद असावेत ! रेशनिंगचे महान प्रयोग: ३ लिटरमध्ये जग जिंका! संत कबीर नगर आणि महाराजगंजच्या जिल्हा प्रशासनाने इंधन वाटपाचे जे काही महान गणित मांडले आहे, ते पाहून गणिताचे थोर तज्ज्ञही आत्महत्या करतील. इथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी असा आदेश काढला आहे की, एका दुचाकीला फक्त ३ लिटर पेट्रोल मिळेल. आता ३ लिटर पेट्रोलमध्ये माणसाने पेट्रोल पंपापर्यंतची रांग पार करावी की घरापर्यंत पोहोचावे, हा एक गहन संशोधनाचा विषय आहे. चारचाकी गाड्यांना १५-२० लिटरची ‘भलीमोठी’ खैरात वाटली जात आहे, तर ट्रकला ३०-४० लिटर बरं, हे इंधन घेण्यासाठीही वेळेचे बंधन आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंतच पंप सुरू राहतील. उरलेल्या १०-११ तासात पेट्रोल पंपांनी कदाचित स्वतःचे आंतरिक सौंदर्य जपावे, अशी सरकारची इच्छा असावी. शेतकऱ्यांची रजिस्ट्री आणि नेपाळचे प्रेम आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांची तर चंगळच आहे. त्यांना १५ लिटर डिझेल घेण्यासाठी फार्मर रजिस्ट्री दाखवावी लागणार आहे, जणू काही ते डिझेल नसून सोन्याचे दागिने खरेदी करत आहेत. दुसरीकडे, नेपाळमध्ये पेट्रोल ३५ ते ५० रुपयांनी महाग असल्याने तिकडची वाहने भारतीय सीमेवर येऊन आमचे मुबलक पेट्रोल पिऊन जात आहेत. म्हणजे, घरचा मुलगा उपाशी आणि शेजाऱ्याला तुपाशी, अशी ही आंतरराष्ट्रीय उदारता सध्या उत्तर प्रदेशच्या सीमेवर पाहायला मिळत आहे. मधु दंडवते विरुद्ध आजची नौटंकी १९९० च्या संकटाचा उल्लेख येतो, जेव्हा व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते आणि मधु दंडवते अर्थमंत्री होते. त्यावेळी दंडवते यांनी स्वतःच्या आणि मंत्र्यांच्या पेट्रोल कोट्यात २०% कपात केली होती. सरकारी गाड्या रविवारी वापरण्यावर बंदी घातली होती. पण आजचे चित्र पहा! मोदीजी जनतेला उपदेश करत आहेत आणि स्वतःचे भव्य रोड शो मात्र थांबायला तयार नाहीत. पेट्रोल वाचवण्याचे ज्ञान देणाऱ्या नेत्यांच्या ताफ्यात एकही गाडी कमी झालेली दिसत नाही. मध्यंतरी जेव्हा सोशल मीडियावर टीका झाली, तेव्हा आमचे देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) बुलेटवर फिरले, कोणी सायकलवर बसले, तर कोणी बैलगाडीवर. हे दोन दिवसांचे मंचन संपले की पुन्हा त्याच आलिशान गाड्या आणि तोच पेट्रोलचा धूर! जनतेने मात्र ३ लिटरच्या मर्यादेत राहून देशभक्ती सिद्ध करायची आहे. कृत्रिम टंचाई की सरकारी अपयश? जिल्हाधिकारी म्हणतात की, पुरेसे इंधन उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे आणि लोक उगीच गर्दी करत आहेत. वा! म्हणजे पेट्रोल पंपावर ५०-५० किलोमीटरवरून लोक हौस म्हणून रांगा लावत आहेत तर? लोकांना घरात बसून कंटाळा आला म्हणून ते रिकाम्या डब्यासह पेट्रोल पंपावर पिकनिक मनवायला जात आहेत, असाच या सरकारी विधानाचा अर्थ निघतो. निष्कर्ष: ७ रुपयांचा धक्का आणि जनतेची डायरेक्ट हिट पेट्रोलच्या किमती ७ रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी ही रक्कम छोटी वाटत असली, तरी शेवटच्या माणसाचे कंबरडे मोडण्यासाठी ती पुरेशी आहे. महागाईने आधीच मारले होते, आता पुरवठा साखळी तुटल्याने शेती आणि वाहतूक क्षेत्र ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. एकूणच काय, तर नेपाळ सीमेवर पेट्रोल संपले आहे, पण सरकारचा खोटेपणा आणि जुमलेबाजी मात्र ओव्हरफ्लो होत आहे. पेट्रोल पंप मालकांनी दोरखंड बांधून पंप बंद केले आहेत, जेणेकरून कोणीही आत येऊ नये. कदाचित जनतेने आता आपल्या वाहनांनाही दोर बांधून ती ओढत नेण्याची वेळ आली आहे, कारण अच्छे दिनच्या रांगेत उभे राहण्यासाठी पेट्रोलची गरज लागते आणि ते तर आता मर्यादित झाले आहे! Kanthak Suryatal Post Views: 378 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यात PSI बदल्यांचा मोठा निर्णय; 491 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या नांदेड मध्ये ४८०० हून अधिक शस्त्रसाठा प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला