मिळालेल्या माहितीनुसार, कदम यांनी आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच तब्बल पाच लाख रुपयांत विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या अनुषंगाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील त्यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. घरातील विविध कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवजांची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चौकशीदरम्यान सीबीआयने कदम कुटुंबीयांना पेपर नेमका कुठून मिळाला, कोणामार्फत संपर्क झाला, व्यवहार कधी आणि कुठे झाला यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. तपास पथकाने घरातील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शुक्रवारी लातूरमध्ये मोटेगावकर या नामांकित कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे पथक थेट नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पुणे-लातूर-नांदेड असा नीट पेपरफुटीचा संभाव्य नेटवर्क तपास यंत्रणेसमोर उलगडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणात पुढील चौकशीसाठी कदम कुटुंबीयांना पुणे येथे हजर राहण्याचे समन्सही सीबीआयकडून बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना असून, तपास यंत्रणांकडून या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
