नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने 14 मे रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच दोन इसम घटनास्थळावरून पसार झाले.
कारवाईदरम्यान एक ट्रॅक्टर ज्यात एक ब्रास रेती होती, पाण्यात तरंगणारे 32 तराफे तसेच रेती उपसा करण्यासाठी वापरली जाणारी चार इंजिने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 39 लाख 55 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गजानन व्यंकटी वाघमोडे (वय 25, रा. बेटसांगवी ता. लोहा) व आनंद गोविंदराव गोळेगावले (रा. जक्कल ता. लोहा, ट्रॅक्टर मालक) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोळकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच पोलीस अंमलदार वसंत केंद्रे,मारोती पंचलिंग,विनोद पवार,सचिन चावरे,समीर अहेमद,शंकर माळगे यांनी पूर्ण केली.

