नांदेड (प्रतिनिधी) – देगलूरमध्ये राजकारण, पोलीस प्रशासन आणि आशीर्वादशास्त्र यांचा एक भन्नाट संगम पाहायला मिळाला. कारण देगलूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिलेला मुख्यमंत्री होण्याचा आशीर्वाद अखेर देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्याच गळ्यात अडकला, अशी चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे.आत तेथे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांना पाठवण्यात आले आहे. घटना अशी की, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूरमध्ये मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम असला तरी वातावरण निवडणूक सभेलाही लाजवेल असेच होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या मारुती मुंडे यांनी भाषण करताना उत्साहाच्या भरात काँग्रेस नेते सुमठाणकर यांना थेट भविष्यात मुख्यमंत्री व्हा असा आशीर्वाद देऊन टाकला. पोलीस अधिकाऱ्यांनी साधा शुभेच्छा संदेश द्यावा अशी अपेक्षा असताना थेट मुख्यमंत्रीपदाचा आशिर्वाद मिळाल्याने उपस्थित मंडळींचे डोळे विस्फारले. कार्यक्रम संपला, केक कापला, टाळ्या वाजल्या… पण खरी फटाकेफोड नंतर झाली. भाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा स्फोट झाला. पोलीस अधिकारी राजकीय भविष्यवाणी करत असतील, तर ज्योतिषांना बेरोजगारीची भीती वाटावी इतकी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, प्रशासनानेही वेळ न दवडता आपली शैली दाखवली. 14 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी जिल्हा विशेष शाखेत कार्यरत पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी देगलूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. इतक्या अचूक वेळेत झालेली ही बदली पाहून घड्याळालाही शंका यावी, इतकी ती नियोजनबद्ध असल्याची चर्चा सुरू आहे. मारुती मुंडे यांना जिल्हा नियंत्रण कक्षात बोलावण्यात आल्याची कुजबुजही सुरू झाली. कारण प्रशासनात आशीर्वादाचे वजन कधी कधी पदापेक्षाही जड ठरते, असे जाणकार सांगतात. दुसरीकडे, बराच काळ जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सूर्यमोहन बोलमवाड यांना अपेक्षित पोस्टिंग न मिळाल्याची चर्चा असली, तरी अखेर देगलूर पोलीस ठाण्याची जबाबदारी त्यांच्या गळ्यात पडली. एकूण काय, वाढदिवसाचा कार्यक्रम झाला, आशीर्वाद दिला गेला, ऑडिओ व्हायरल झाला आणि प्रशासन हलले. आता देगलूरकरांना एकच प्रश्न पडला आहे. पुढचा आशीर्वाद कोणाला आणि बदली कुणाची? कारण इथे शब्दांनाही सेवा नियम लागू होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे Kanthak Suryatal Post Views: 1,995 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बेटी बचाओ बेटी पढाओ,नारी वंदनचा ढोल आणि सत्तेचा नंगानाच: केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राचे पोक्सो कांड आणि मोदींचे मौन! मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला