नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी अवैध वाळू उपसा करून चोरी करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २.२५ वाजण्याच्या सुमारास देगलूर नाका परिसरात नाकाबंदी सुरू असताना भरधाव वेगाने जाणारा हायवा संशयित आढळला. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव राहुल आनंदा पवार (वय ३८, रा. टाकळी, ता. मुदखेड) असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी पाच ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी हायवा क्रमांक MH-26/BD-1213 तसेच रेती असा एकूण ३० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुरनं १५६/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार (IPS), अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक प्रवीण आगलावे, पोलिस अंमलदार बालाजी चंचलवाड आणि चुकलवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
