नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. राज्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अवैध शस्त्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांना अवैध शस्त्रसाठ्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह मंगळवारी सकाळी शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुद्वारा परिसरात छापा टाकला. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रांचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ हजार ७९६ शस्त्रे जप्त केली असून त्यामध्ये तलवारी, कुपऱ्या, खंजर तसेच विविध प्रकारची धारदार हत्यारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेल्या शस्त्रांची अंदाजे बाजार किंमत ४३ लाख ४८ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी जसवंत सिंघ प्रकाश सिंघ सुखमणी (रा. रामदास नगर, अपचल नगर परिसर, नांदेड) यावर आणि अभिजित गिरधर सातपुते (रा. बळीरामपूर) अश्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभिजित सातपुते यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे शस्त्रसाठा कसा आला, तो कुठे विक्रीसाठी आणला होता तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेला संपूर्ण शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा शस्त्रसाठा कोलंबिया, चीन, अमेरिका तसेच इतर परदेशांतून आणण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राज्यातील अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आळा बसण्यास या कारवाईमुळे मदत होणार असल्याचे पोलिसांचे मत आहे. दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र व्यवहारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,802 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम; पाच दिवसांत ५२ गुन्हे दाखल भूखंडावर जबरदस्ती ताब्याचा प्रकरण; पोलिसांकडून सिव्हिल मॅटर म्हणत टाळाटाळ?