नांदेड (प्रतिनिधी) : शहरात अनाधिकृत बॅनरबाजीने अक्षरशः थैमान घातले असून, यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः शहरातील प्रमुख चौक, दुभाजक आणि रस्त्यालगतच्या विद्युत खांबांवर लावण्यात येणाऱ्या बॅनरमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नांदेड शहरात सध्या ‘कोणीही उठा आणि बॅनर लावा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेते, सामाजिक संघटना तसेच व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य पद्धतीने बॅनर लावले जात असून, यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने बॅनर लावण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केल्या असून त्यासाठी आकार, शुल्क आणि नियम देखील ठरवून दिले आहेत. मात्र या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अधिकृत जागा रिकाम्या असताना सार्वजनिक ठिकाणी, दुभाजकांवर आणि वर्दळीच्या रस्त्यांवर बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान, रविवारी (दि. 26) शिवाजीनगर परिसरातील एसबीआय बँकेसमोरील दुभाजकावर एका व्यावसायिकाने लावलेले बॅनर अर्धवट तुटून खाली लोंबकळत होते. या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकली असती. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र संभाव्य अपघाताचा धोका नाकारता येत नाही. नागरिकांच्या मते, अशा प्रकारच्या बॅनरमुळे केवळ वाहतुकीत अडथळे निर्माण होत नाहीत, तर शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होतो. तसेच वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे हे बॅनर तुटून खाली पडण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांनी तातडीने कारवाई करून अनाधिकृत बॅनर हटवावेत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. एकंदरीत, वाढत्या बॅनरबाजीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे प्रशासन कधी गांभीर्याने लक्ष देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. Kanthak Suryatal Post Views: 634 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड परिसरात गुन्हे, अमली पदार्थ व बेकायदा शस्त्रांवर मोठी कारवाई; २५ दिवसांत १३१ गुन्हे दाखल; सुमारे ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त सर्वोच न्यायालयाचा वक्फ जमिनींच्या वादांवर आणि मालकी हक्काच्या दाव्यांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार