नांदेड (प्रतिनिधि)- विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणात न्यायालयाने आरोपी पंडितराव गोविंदराव ठीकले याला दोषी ठरवले. फिर्यादी पोलिस ठाणे विमानतळ परिसर नांदेड येथील रहिवासी असून, त्यांच्या मुलीशी आरोपीने लैंगिक छळ केल्याची तक्रार होती.
घटना दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1.30 वाजताची आहे. पीडित मुलगी भात वाढत असताना आरोपीने तिच्याकडील टोपले घेतले व दुकानात नेले. तेथे तिची ओढणी जोरात ओढून छातीला हात लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरून गेल्याने तिला झोप येईना, असे तिने वडिलांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला (गु.र.नं. 319/2021, कलम 354-अ, भारतीय दंड संहिता व कलम 8, 12 पोक्सो).तपास पोलीस उपनिरीक्षक एस.ए. रेडेकर यांनी केला. सरकार पक्षाने 7 साक्षीदार तपासले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे यांनी आरोपीला दोषी ठरवून कलम 354-अ व कलम 8 पोक्सो अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड ठोठावला. सरकारी वकील अड़. रणजीत देशमुख यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी देवप्पा विभुते , पोलीस अंमलदार रामदास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.
