नायगाव (प्रतिनिधी)- येथील पानसरे नगर येथे मुलानेच वडिलांचा फरशीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनातून आणि वडील दुसऱ्या कडून जेवण मागून खातो या कारणावरून हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारोती माणिक गटलेवार (वय ६५, रा. पानसरे नगर, नायगाव) हे मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मुलगा नामदेव हा दारूच्या व्यसनाधीन असून दिवसभर मद्यप्राशन करून फिरत असल्याचे सांगितले जाते. वडील स्वतः दुसऱ्यांकडून जेवण मागून आणत तसेच मुलाच्या जेवणाचीही व्यवस्था करत होते.
मात्र वडील इतरांकडून जेवण मागून खात असल्याच्या कारणावरून मुलाच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातूनच दिनांक १ एप्रिल रात्री १० वाजेपासून ते २ एप्रिल पहाटे ७ वाजेच्या दरम्यान नामदेव याने फरशीने गंभीर प्रहार करून वडिलांचा खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मयत मारोती गटलेवारचे बंधू बालाजी माणिक गटलेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक तोटेवाड पुढील तपास करत असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.
