संगीत विभागात मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या संगीत विभागामार्फत दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संगीत विभागाचे माजी विद्यार्थी शेख रोशन उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी संस्कृत विभागाचे प्रा. अभय पाटील यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे सामोरे जावे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, तसेच तणावमुक्त राहून यश कसे संपादन करावे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी टाकळकर हिने सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. तिच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर मुरडे वैजनाथ यांनी सादर केलेल्या अभंग गायनाने कार्यक्रमाला भक्तिमय रंग प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीत विभाग प्रमुख डॉ. दिपाली पांडे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमधून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचा समारोप संगीत विभागातील सम्राट घाटके यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापक व उपस्थित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. एकूणच, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!