नवीन नांदेड (प्रतिनिधी) – अवैध शस्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण 2 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बोंगी पाटी टी पॉईंट परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर संशयितांना पकडून त्यांच्या झडतीत एक सिंगल शॉट पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक डॅगर (चाकू) आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 297/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 3/25, 4/25, 7/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्यासह पथकाने ही कारवाई यशस्वी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख रिजवान शेख निसार (वय 23), शेख शाहेद शेख चांद (वय 19), शेख सोहेल शेख इशाक (वय 25), शेख आबिद शेख युनूस (वय 24) आणि आनंद उर्फ चिंटू सखाराम यादव यांचा समावेश आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून अवैध शस्त्र विक्रीच्या साखळीचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभागी पथकाचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,309 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहाजी उमाप यांना प्रथम पारितोषिक प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस