पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदेड शहरात काही मेडिकल चालक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे ,गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक महेश माळी,पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख,नरेश वाडेवाले,पोलीस अंमलदार विशाल माळवे,गजानन किडे,विष्णू मुंढे,राहुल लाठकर,नागनाथ चापके,राहुल घुले,अदनान पठाण,अंकुश पठाण यांनी सापळा रचून तपास सुरू केला.
तपासादरम्यान राज कॉर्नर जवळील हनुमान फार्मा या मेडिकलवर बनावट ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळ्या विकल्या जात असल्याची खात्री करण्यात आली. आरोपी मेडिकल चालकाने 10 गोळ्या 250 रुपयांना विक्री केल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त छापेमारी करण्यात आली. या छाप्यात 1600 प्रेगाबालिन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 70,400 रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित मेडिकल चालकाकडे या औषधांच्या खरेदी-विक्रीची कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा प्रकारच्या औषधांची विक्री करू नये, असे आवाहन भाग्यनगर पोलिसांनी केले आहे.
