23 मार्चला नागपूरातील आरएसएस मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा –  ॲड.प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

मोदी अमेरिकेसमोर नाचत आहेत, आरएसएसने भूमिका स्पष्ट करावी!

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मार्च रोजी नागपूरातील आरएसएसच्या मुख्यालयावर भव्य मोर्चा आणि धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बोलताना आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, आज देशाच्या धोरणांवर भारताचा नाही तर अमेरिकेचा प्रभाव दिसत आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर झुकले आहेत आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणारे निर्णय घेत आहेत.

आंबेडकर म्हणाले की, आरएसएसने स्वातंत्र्यलढ्यात कोणतीही ठोस राजकीय किंवा सामाजिक भूमिका बजावली नव्हती. आजही देशातील गंभीर प्रश्नांवर आरएसएस मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांना सत्तेत आणण्यात आरएसएसची मोठी भूमिका होती. मात्र विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये पंतप्रधानांचे नाव समोर येऊनही संघाने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही 23 मार्च रोजी नागपूर येथे आरएसएसला थेट प्रश्न विचारणार आहोत.

आंबेडकरांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांच्या मते, जागतिक राजकारणात भारताची भूमिका कमकुवत झाल्याने गॅस व इंधनपुरवठ्यावर परिणाम होत आहे. ओमान आणि कतारमधून भारताला गॅस मिळतो, मात्र काही पुरवठा रोखल्याने देशात संकटाची स्थिती निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी जनतेला आवाहन करताना म्हटले की, ज्या भारतीय जनता पक्षाला जनतेने सत्ता दिली आहे, त्या पक्षाचे खासदार, आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या घरी जाऊन जनतेने विचारावे गॅस मिळत नाही, तर आम्हाला जेवायला घाला. अशा प्रकारचे आंदोलन उभे राहिले पाहिजे.”

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना न्यायालयासमोर हजर करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाचा आदेश लवकरच येण्याची शक्यता आहे. आदेशानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंबेडकर यांनी मध्यमवर्गीय समाजालाही आवाहन केले. फक्त नरेंद्र मोदीच आमच्या समाजाचे भले करू शकतात, असा खोटा प्रचार केला जात आहे. मध्यमवर्गीय समाजाने या प्रचाराला बळी पडू नये, असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी 23 मार्च रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!