नवीन नांदेड (प्रतिनिधी)- अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेऊन सुमारे 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 12 मार्च रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोंढार बायपास कांदा मार्केट टी-पॉईंट, नांदेड येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत एमएच-29-BE-4197 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकमध्ये अंदाजे 40 लाख रुपयांचा ट्रक व त्यामध्ये भरलेली 25 हजार रुपयांची रेती असा एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बाबुशा नागोराव गजभारे (वय 46, रा. पंचशील नगर वाजेगाव, ता. जि. नांदेड), तिरुपती कदम (रा. बसवेश्वर नगर कौठा नांदेड) आणि अंकुश म्हस्के (रा. नागापूर, ता. जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस उप निरीक्षक सुनील भिसे,पोलीस अंमलदार मुंढे,जाधव,कल्याणकर,सिरमालवर,पवार आणि कदम यांनी केली. दरम्यान, अवैध रेती वाहतुकीविरुद्ध पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
